इतिहासातील सर्वात खराब कामगिरी
By admin | Published: October 20, 2014 05:26 AM2014-10-20T05:26:10+5:302014-10-20T05:26:10+5:30
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला. गेल्यावेळी ८२ जागा जिंकलेल्या प्रमुख सत्तारूढ पक्षाला ४२ जागांवर समाधान मानावे लागले
यदु जोशी, मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला. गेल्यावेळी ८२ जागा जिंकलेल्या प्रमुख सत्तारूढ पक्षाला ४२ जागांवर समाधान मानावे लागले. राज्याच्या इतिहासात काँग्रेसची ही नीचांकी कामगिरी आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात पक्षाने ही निवडणूक लढविली होती. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पावणेचार वर्षांत केलेली कामगिरी, घेतलेले निर्णय आणि जपलेली स्वच्छ प्रतिमा या भरवशावर काँग्रेस मैदानात उतरली, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे पुत्रप्रेमामुळे यवतमाळमध्ये तळ ठोकून असल्यासारखे होते. निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला तो लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर दिला असता, तर काँग्रेसला पोषक ठरले असते.
पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे हे एकत्रितपणे वा परस्पर समन्वयातून प्रचार करीत असल्याचे कुठेही दिसले नाही. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभाही कमीच झाल्या. प्रचार समितीचा आमच्याशी कुठलाही समन्वय नाही, अशी कुरबुर काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दररोज सुरू होती.