काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या पाकिस्तान दौ-याचे भाजपने स्वागत केले असते का ? - उद्धव ठाकरे

By Admin | Published: December 28, 2015 08:20 AM2015-12-28T08:20:36+5:302015-12-28T17:46:41+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धावत्या पाकिस्तान दौ-यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपरोधिक टीका केली आहे.

Would the BJP have welcomed the Prime Minister of Pakistan's visit to Pakistan? - Uddhav Thackeray | काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या पाकिस्तान दौ-याचे भाजपने स्वागत केले असते का ? - उद्धव ठाकरे

काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या पाकिस्तान दौ-याचे भाजपने स्वागत केले असते का ? - उद्धव ठाकरे

googlenewsNext

ऑनलाइन लेकमत
मुंबई, दि. २८ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धावत्या पाकिस्तान दौ-यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपरोधिक टीका केली आहे. काँग्रेसचे पंतप्रधान अचानक लाहोर किंवा कराचीत उतरले असते, तर भाजपने त्यांच जंगी स्वागत केलं असतं का? असा खोचक सवालही अग्रलेखात विचारला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमालीचे धाडसी आणि धुरंधर राजकारणी असल्यामुळे त्यांनी नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन मास्टर स्ट्रोक मारल्याची चर्चा सुरु आहे. भारत-पाक संबंध सुधारावेत अशी आमचीही इच्छा आहे, मात्र पाकची भूमी शापित आहे. तिच्या नादी जे लागले त्यांचं राजकारणच संपलं अस अग्रलेखात म्हटलं आहे. 

मोदींच्या पाक भेटीचं स्वागत होत असलं तरी पूर्वीचे अनुभव पाहता पंतप्रधानांनी जरा जपून पाऊल टाकावं अन्यथा मोदींना वाजपेयींप्रमाणे धोका होऊ शकतो असा सल्लाही यातून मोदींना देण्यात आला आहे.
 
 
अग्रलेखातील मुद्दे 
 
मॉस्को, काबूल असा प्रवास करीत मोदी यांनी विमान अचानक लाहोरकडे वळवून राजकीय ‘मास्टर स्ट्रोक’ मारल्याची चर्चा सुरू आहे. मोदी हे धुरंधर राजकारणी असल्यानेच असा धाडसी निर्णय ते घेऊ शकले, असेही बोलले जात आहे. मोदी यांच्या या धाडसी पावलांमुळे पाकिस्तानची कोंडी झाल्याचे चित्र रंगवले जात आहे. मोदी यांनी शरीफ यांना वाढदिवसाच्या फक्त शुभेच्छा दिल्या नाहीत तर शरीफ यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातीच्या लग्नात सहभागी झाले, वृद्ध आईला वाकून नमस्कार केला… असे बरेच काही अचानक घडले व मोदी पुन्हा एकदा दिल्लीस परतले आहेत. आता मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नवाज शरीफही अचानक दिल्लीत उतरले तरी आश्‍चर्य वाटायला नको. 
 
मोदी हे पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्यासाठी जे श्रम घेत आहेत ते कौतुकास्पद आहे, पण मोदी ज्या प्रकारचे श्रम घेत आहेत व या श्रमाचाच भाग म्हणून काँग्रेसचे एखादे पंतप्रधान अचानक लाहोर किंवा कराचीत उतरले असते तर ‘भाजप’ने त्या कृतीचे आजच्याप्रमाणे जंगी स्वागत केले असते काय, असा प्रश्‍न देशाच्या मनात निर्माण झाला आहे. 
 
हिंदुस्थानातील जे जे राजकारणी पाकच्या कच्छपी लागले त्यांचे राजकारण पुढे फार चालले नाही अशी एक अंधश्रद्धा आहे. श्री. लालकृष्ण आडवाणी हे ‘जीनां’च्या कबरीवर जाऊन त्यांचे गुणगान करून आले व त्यांच्या राजकारणास उतरती कळा लागली आणि आज ते अडगळीत फेकले गेले. वाजपेयी यांनी ‘लाहोर बस’ सोडण्यापासून पुढे आग्रा येथे जनरल मुशर्रफ भेटीपर्यंत श्रम घेऊन पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, पण त्यानंतर वाजपेयींच्याच नेतृत्वाखालील भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाही. पाकिस्तानची भूमी ही अशी शापित आहे. त्या शापित भूमीशी चुंबाचुंबी करणे महाग पडते; कारण लाखो निरपराध्यांचे रक्त त्या भूमीत झिरपले आहे. बाकी आणखी काय सांगावे!
 
मोदी यांच्या अचानक पाकभेटीचे सर्वत्रच जोरदार स्वागत झाले. बाकी हाफीज सईद, इम्रान खान वगैरे लोक काय बरळले ते सोडून द्या. मुख्य म्हणजे मोदी यांच्या पाकभेटीचे कौतुक भाजप मार्गदर्शक मंडळाचे शिरोमणी लालकृष्ण आडवाणी यांनीही केले हे विशेष. मोदी-शरीफ भेटीने दोन देशांतील तणाव निवळून नवे पर्व सुरू होणार असेल तर ते कोणाला नको आहे. फक्त मोदी यांनाही वाजपेयींप्रमाणे धोका होऊ नये हीच आमची ईश्‍वरचरणी प्रार्थना! 
 
 

Web Title: Would the BJP have welcomed the Prime Minister of Pakistan's visit to Pakistan? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.