... तर दिवसात पैशांनी पोते भरले असते !

By admin | Published: March 12, 2015 12:44 AM2015-03-12T00:44:27+5:302015-03-12T00:49:13+5:30

मंडलिक यांच्या आठवणी : कुटुंबासाठी काही करू शकलो नाही ही बोच

... would have filled the grandsons with money in the day! | ... तर दिवसात पैशांनी पोते भरले असते !

... तर दिवसात पैशांनी पोते भरले असते !

Next

विश्वास पाटील-कोल्हापूर -मला पैसेच गोळा करायचे असते आणि वही घेऊन पीए ठेवला असता तर दिवसात पोते भरेल एवढे पैसे मी कधीही गोळा करू शकलो असतो परंतु राजकीय जीवनात तो मार्ग मी कधीच पत्करला नाही. सामान्य गोरगरीब माणूस आजही माझ्या मागे का येतो हेच त्याचे कारण असल्याचे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक सातत्याने बोलून दाखवत. अनेक लढाया लढूनही ते त्यात यशस्वी का झाले, त्याचेही हेच कारण असावे...मंडलिक यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्यावर काल मंगळवारी मुरगूडला अंत्यसंस्कार झाले. एक झंझावात शांत झाला. मागचे काही दिवस महाराष्ट्रासाठी वाईट गेले. ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांची हत्या व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मंडलिक यांच्या निधनाने सामान्य माणसाला मोठा धक्का बसला. कारण या तिन्ही नेत्यांची सामान्य जनतेशीच नाळ जोडलेली होती. स्वच्छ चारित्र्य आणि विचारांची बांधीलकी हा या तिघांना जोडणारा समान धागा होता. त्यामुळे आज दिवसभरही सगळीकडे त्याबद्दलच दु:खाची भावना व्यक्त झाली.मंडलिक यांच्यासोबत गेली अनेक वर्षे सावलीसारखे राहिलेल्या अमर पाटोळे, संजय भोसले यांच्यासह वीसहून अधिक जणांना तर आजचा दिवस कमालीचा वेदनादायक गेला. कारण आपलाच वडील गेल्याचे दु:ख त्यांनी अनुभवले. क्षण अन् क्षण त्यांचा मंडलिकसाहेबांच्या आठवणींतच गेला. या सर्वांशी बोलताना मंडलिकसाहेब दोन-तीन गोष्टी सातत्याने व्यक्त करत. कुटुंबासाठी काही करता आले नाही याची बोच त्यांना सतत वाटत असे. समाजासाठी ज्यांना काम करायचे आहे, त्याने लग्न करू नये, असे ते नेहमी म्हणत.मंडलिक हे चारवेळा आमदार व चारवेळा खासदार, एकदा राज्यमंत्री होते. आता कोणत्याही कामासाठी लोकप्रतिनिधींकडूनही टक्केवारी लावली जाते. त्याअनुषंगाने चर्चा सुरू झाली की ते म्हणायचे,‘अरे मला पैसेच गोळा करायचे असते तर दिवसाला पोते भरेल एवढे पैसे मी सहज जमा करू शकलो असतो..परंतु तो माझा पिंड नाही.
माझ्याकडे येणारा माणूस सगळीकडे प्रयत्न करून थकल्यानंतर येतो. मंडलिकसाहेबांकडून काहीतरी मदत होईल असे त्याला वाटे. हा गोरगरिबांना वाटणारा विश्वास हीच माझी संपत्ती आहे. त्या संपत्तीच्या बळावरच मी आतापर्यंतच्या सगळ््या लढाया लढलो आणि जिंकलोही. त्यामुळे त्या विश्वासाला मी कधी बट्टा लागून देणार नाही.’मंडलिक यांना कार्यकर्त्यांची चांगली पारख होती. त्यांना भेटायला आलेला माणूस घराबाहेर पडला की ते लगेच त्याचे मूल्यमापन करायचे. खरेच कोण आपल्याला मदत करणारा आहे व कोण नुसताच अंदाज काढणारा आहे, याचे मर्म ते ओळखत. कागल तालुक्याच्या राजकीय लढाईत त्यांना टोकाच्या संघर्षाला सामोरे जावे लागले परंतु त्यालाही ते कधी डगमगले नाहीत. मी मरणार असेल तर देवही वाचवू शकणार नाही आणि जगणार असेल तर देवही मारू शकणार नाही, असे त्यांचे साधे सरळ तत्त्वज्ञान. त्यानुसारच ते जगले आणि इहलोकीचा प्रवास संपल्यानंतरच निघून गेले. मागे कार्य व गदगदायला लावणाऱ्या आठवणी ठेवून...!


सांत्वनासाठी मुरगूडला नेत्यांची रीघ
ज्येष्ठ नेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन करण्यासाठी बुधवारी दिवसभर मुरगूडला विविध स्तरांतील लोकांची रीघ लागली. प्रा. संजय मंडलिक व कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली.
मंडलिक यांचे रक्षाविसर्जन आज, गुरुवारी मुरगूडला आहे. मंडलिक यांच्यावर तिथेच जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे संजय मंडलिकही आणखी काही दिवस मुरगूड येथेच थांबणार आहेत. बुधवारी दिवसभर कागलसह राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यांतील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिवसभर येत होते.
सकाळी साडेसात वाजता आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रा. मंडलिक यांची भेट घेतली. काही व्यक्तिगत कामांमुळे त्यांना काल अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहता आले नव्हते. त्यांच्याशिवाय माजी मंत्री विलासकाका उंडाळकर, मदन पाटील, कर्नाटकचे माजी मंत्री मल्हारराव पाटील, माजी खासदार उमेश कत्ती, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. प्रकाश शहापूरकर, गुलाबराव घोरपडे, अरुण इंगवले, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह अनेकांनी भेटून आधार दिला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून मंडलिक यांचे सांत्वन केले.

Web Title: ... would have filled the grandsons with money in the day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.