...तर माळीण वाचले असते!
By admin | Published: August 4, 2014 04:06 AM2014-08-04T04:06:30+5:302014-08-04T04:06:30+5:30
मान्सून तीव्रपणे सक्रिय असल्याने महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील पश्चिम घाटामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन घडेल,
पुणे : मान्सून तीव्रपणे सक्रिय असल्याने महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील पश्चिम घाटामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन घडेल, असा इशारा अमेरिकेच्या नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) या संस्थेने आपल्या संकेतस्थळावर २९ जुलैला दिला होता. महत्त्वाचे म्हणजे, पश्चिम घाटातील आंबेगाव तालुका व भीमाशंकरच्या परिसरात सलग ३ दिवस ६०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने तेथे भूस्खलनाचा अतितीव्र धोका असल्याचे या अहवालात सांगण्यात आले होते. या अहवालानंतर २४ तासांतच माळीण गावात भूस्खलनाची भयानक घटना घडली.
माळीणची दुर्घटना घडण्याअगोदरच नासाने याचा अॅलर्ट दिला होता. मात्र, इतर देशांकडून इशारा देण्यात आला असेल तर त्याचा अभ्यास करून ती तातडीने राज्यांपर्यंत पोहोचवून जीवितहानी रोखेल, अशी यंत्रणाच सरकारकडे नाही. केंद्रातील अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती. नासाचा अंदाज आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही, अशी माहिती भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे महासंचालक हरबन्स सिंग यांनी दिली.