...तर संघर्ष यात्रेची गरज नसती- बच्चू कडू
By admin | Published: April 4, 2017 12:07 AM2017-04-04T00:07:50+5:302017-04-04T00:07:50+5:30
स्वामीनाथन आयोगाने २00६ मध्ये केलेल्या शिफारशी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने लागू केल्या असत्या तर संघर्ष यात्रा काढण्याची वेळ आली नसती असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस-राकाँला टोला :स्वामिनाथन आयोगाकडे का दुर्लक्ष केले?
अकोला : शेतकऱ्यांच्या संपूर्ण प्रगतीचा विचार करून स्वामीनाथन आयोगाने सन २००६ मध्ये अहवाल सादर करून काही शिफारशी केल्या. या शिफारशी लागू केल्या असत्या, तर किमान शेतमालाला रास्त भाव मिळाला असता व शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढला नसता; मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने या शिफारशी गुंडाळून ठेवल्या; आता हेच पक्ष कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत या शिफारसी मान्य करून अंमलबजावणी केली असती, तर संघर्ष यात्रा काढण्याची वेळ आली नसती, असा टोला आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी मारला.
शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्तीच नाही, तर त्यांना भविष्यात कर्ज काढण्याची गरज निर्माण होणार नाही, या साठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सीएम टू पीएम अशी ‘आसूड यात्रा’ सुरू करीत असल्याची माहिती आ. कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील प्रहार संघटनेच्यावतीने आसूड यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या रथाचे पूजन आ. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ.कडू म्हणाले, की शेतकऱ्यांना भक्कमपणे आधार देण्यासाठी पेरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेतून करण्यात यावा, शेतमालावरील निर्यात बंदी हटविण्यात यावी, शहराप्रमाणेच गावातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्यांसह स्वामीनाथन आयोगाची अमंलबजावणी व संपूर्ण कर्जमुक्ती याकडे लक्ष वेधण्यासाठी ही आसूड यात्रा आहे.
महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून ही यात्रा सुरू होणार आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर येथे यात्रेचा समारोप केला जाईल. समारोपप्रसंगी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना एक हजार कार्यकर्ते रक्तदान करून श्रद्धांजली अपर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...तर मंत्र्यांच्या गाड्यांना काळे फासणार!
अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन प्रहारने केलीच आहे, आता आसूड यात्रेनंतर अकार्यक्षम मंत्र्यांच्या विरोधात आसूड उगारण्याची तयारी प्रहारने केली असल्याची माहिती आ.कडू यांनी दिली. जे मंत्री केवळ वैयक्तिक लाभाचाच विचार करून काम करीत आहेत, अशा मंत्र्यांच्या गाड्यांना काळे फासण्याचे आंदोलन हाती घेण्यात येईल व त्याची सुरुवात विदर्भातूनच करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.