शस्त्रांचे ‘ते’ ७३ घाव
By admin | Published: November 11, 2014 01:02 AM2014-11-11T01:02:23+5:302014-11-11T01:14:08+5:30
एकनाथ दुर्योधन चव्हाण (४२), सुमेध सुरेश करवाडे (३५), दिलीप महादेव शेंडे (४२), पंकज सुधाकर भगत (३६), सविता जितेंद्र वंजारी (३६), भागिरथा हरिचंद्र अडकिणे (६०), लीलाबाई रघुनाथ सांगोळे
१३ आॅगस्ट २००४ रोजी घडली होती घटना
नागपूर : एकनाथ दुर्योधन चव्हाण (४२), सुमेध सुरेश करवाडे (३५), दिलीप महादेव शेंडे (४२), पंकज सुधाकर भगत (३६), सविता जितेंद्र वंजारी (३६), भागिरथा हरिचंद्र अडकिणे (६०), लीलाबाई रघुनाथ सांगोळे (५५), नितेश सीताराम मेश्राम (३१), मनीष शंकरराव लाबडे (३३), अॅड. विलास श्रीराम भांडे (४४), ईश्वर हरिचंद्र अडकिणे (४०), पिंकी अजय शंभरकर (३३), नीलेश सुखदेव हुमणे (३२), रितेश सुखदेव हुमणे (३५), राजेश चंद्रभान घोंगडे (४०), उषा मधुकर नारायणे (३६), विजय मयूर शिंदे (३५) आणि राजेश दत्तू उरकुडे, अशी निर्दोष सुटका झालेल्या आरोपींची नावे असून ते सर्व कस्तुरबानगर येथील रहिवासी आहेत. अजय सुदाम मोहोड, अंजना किसन बोरकर आणि देवांगना सुखदेव हुमणे, अशी निधन झालेल्या आरोपींची नावे आहेत. सरकार पक्षानुसार तब्बल दहा वर्षांपूर्वी १३ आॅगस्ट २००४ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारातील ऐतिहासिक दगडी इमारतीमध्ये चालणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालय क्रमांक ७ मध्ये भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव या ३२ वर्षीय खतरनाक गुंडाचा संतप्त जमावाने डोळ्यात मिरची पावडर झोकून, चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून निर्घृण खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर जमावाने अक्कूचे घर जाळून टाकले होते. कस्तुरबानगर आणि परिसराला आपल्या गुन्हेगारी कृत्याने वेठीस धरणारा अक्कू हा १९९१ पासून गुन्हेगारीत सक्रिय होता. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली, अशी २६ प्रकरणे त्याच्याविरुद्ध होती. १९९९ मध्ये त्याला झोपडपट्टी दादा व घातक व्यक्ती विघातक कृत्य (एमपीडीए) या कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धही करण्यात आले होते. बलात्कार आणि छेडखानीची अनेक प्रकरणे त्याच्या दहशतीमुळे पोलिसांपर्यंत पोहोचतही नव्हती. तडीपार असतानाही तो कायदा मोडून मोहल्ल्यात यायचा आणि गुंडागर्दी करायचा. तक्रारीनंतरही पोलीस त्याला अटक करीत नव्हते.
डोळ्यात मिरची पावडर झोकून केला होता खात्मा
हिंमत करून अक्कूविरुद्ध तक्रार
अॅड. विलास भांडे यांनी हिंमत करून अक्कूविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. परंतु पोलीस गुन्हा दाखल करीत नव्हते. त्यामुळे त्यांनी पत्रपरिषद घेतली होती. त्याची गुंडागर्दी चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर पोलिसांनी दखल घेत दहशत माजवणाऱ्या अक्कूला अटक केली होती. प्रारंभी सदर पोलिसांनी ७ आॅगस्ट २००४ रोजी अटक करून त्याला जरीपटका पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. परंतु त्याचा एक साथीदार बिपीन बालाघाटी हा अक्कूला जेवणाच्या डब्यात चाकू देताना पकडल्या गेल्याने त्याला पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्याला १० आॅगस्ट रोजी न्यायालयात आणण्यात आले होते. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली होती. याच दिवशी त्याचा खून करण्यासाठी जमाव आला होता. परंतु तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादव यांच्यामुळे घटना टळली होती.
कुख्यात डंगऱ्या आहे कुठे?
अक्कू यादव याचा पुतण्या कुख्यात विजय ऊर्फ डंगऱ्या यादव हल्ली आहे कुठे, असा प्रश्न व्यक्त केल्या जात आहे. डंगऱ्या हा अक्कूपेक्षाही क्रूर होता. त्याच्याच बळावर अक्कूची गुंडागर्दी चालत होती. तो लुटमारी आणि बलात्कारासारखे गुन्हे करायचा. लुटमारीतून बऱ्याच जणांचा खून करून त्याने त्यांना रेल्वेखाली झोकले. त्यामुळे त्याचे हे गंभीर गुन्हे कधीही चव्हाट्यावर आलेच नाहीत. त्यावेळी जरीपटका पोलिसही रेल्वेने कटलेल्या मृतदेहांचीही गंभीर दखल घेत नव्हते. या क्रूरकर्म्यांच्या कृत्याने कस्तुरबानगरातील १८ ते २० कुटुंबांनी आपले घर सोडले होते. हे दोघे कस्तुरबानगरामागील एनआयटीच्या गाळ्यांमध्ये महिला व तरुणींना नेऊन बलात्कार करायचे. कस्तुरबानगर येथील त्रस्त नागरिकांची आधी क्रूरकर्म्या डंगऱ्याचा गेम करण्याची योजना होती. परंतु अखेरपर्यंत तो त्यांच्या हाती लागला नाही. अक्कूच्या खुनानंतर तो कधीही कस्तुरबानगरात फिरकला नाही.
चोख पोलीस बंदोबस्त
अनुचित घटना टाळण्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. न्यायालयात येणाऱ्यांची कसून तपासणी केली जात होती. संशयास्पद व्यक्तींना आत जाण्यास मनाई केली जात होती. रस्त्यावर मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते. प्रत्येकाला मेटल डिटेक्टरमधून जाणे बंधनकारक होते. पोलीस थोड्या-थोड्या वेळाने परिसरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत होते. मुख्य प्रवेशदारावरही मोठ्या संख्येत पोलीस तैनात होते.