वाह, क्या बात है ! ज्येष्ठ नागरिकांची पुणे ते कन्याकुमारी सायकल वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 12:44 PM2021-01-13T12:44:09+5:302021-01-13T12:45:35+5:30
हे आठही सदस्य सेवानिवृत्त आहेत. सर्वाचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे.
पिंपरी : पुणे ते कन्याकुमारी हे अंतर जवळपास १५९० किलोमीटर आहे. रेल्वेने किंवा बसने हे अंतर पार करायचे म्हटले, तरी थकवा येतो. पुण्यातील यंग सिनियर ग्रुपच्या आठ सदस्यांनी पुणे ते कन्याकुमारी सायकलने वारी काढली. अविनाश मेंढेकर, ( ६३) अनिल पिंपळीकर ( ७०) दत्ता गोखले ( ६३) संजय जोशी ( ६२) पद्यामकर आगाशे ( ६८) मिलिंद संधाने ( ६३) प्रकाश टेंमभेकर( ६१) प्रदीप भालवडकर ( ६५) ही आठ मंडळी प्रवास करीत आहेत.
हे आठही सदस्य सेवानिवृत्त आहेत. सर्वाचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. पुण्यातून ५ जानेवारीला त्यांनी प्रवास सुरू केला. अर्धापेक्षा जास्त अंतर त्यांनी पार केले असून, १८ जानेवारीला कन्याकुमारीला पोहचणार आहेत.
रोज १२५ ते १३० किलोमीटरचा प्रवास ते करत आहेत. प्रवास करताना त्यांना अनेक नागरिक भेट असून, या वयात सायकलने प्रवास करत असल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
इच्छा शक्ती असेल तर वय आडवे येत नाही हे या ज्येष्ठ नागरिकांनी दाखवून दिले आहे. या ग्रुप मधील सदस्य हे नियमीतपणे सायकलने विविध ठिकाणी प्रवास करीत असतात. शनिवारी आणि रविवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एखादे ठिकाण ठरवून त्या ठिकाणी सायकलने ही मंडळी नियमीतपणे जात असतात. त्याचबरोबर कार्तिकी एकादशीला पुणे ते पंढरपूर प्रवास ते करीत असतात.
कोरोनामुळे मगील वर्षी प्रवास करण्याला मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे मागील वर्षी त्यांनी प्रवास केला नाही. परंतु आता ॲनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ही मंडळीनी पुन्हा प्रवास सुरू केला आहे. कोरोनामुळे सर्वाना आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे, हे समजले आहे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी सायकल चालविणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही मंडळी आवडीबरोबरच सायकल चालविणे किती फायद्याचे आहे, हे सांगत आहेत.
--
२०१७ मध्ये पहिल्यांदा पुणे ते कन्याकुमारी सायकलने प्रवास केला. मागील महिन्यापर्यंत सायकलने २७ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. आतापर्यंत राजस्थान, गुजरात, दिल्ली असा सायकलने प्रवास केला आहे. माझा जावई सायकल विकत घेत होता. तेव्हा मला जावयाकडून सायकल चालविण्याची प्रेरणा मिळाली. पुणे ते कन्याकुमारी हे अंतर १४ दिवसात पार करणार आहोत.
अनिल पिंपळीकर, यंग सिनियर गुप, सदस्य