अधिकारांसाठी भांडणारी पत्नी क्रूर नाही
By admin | Published: February 18, 2017 04:03 AM2017-02-18T04:03:14+5:302017-02-18T04:03:14+5:30
स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी पतीविरुद्ध न्यायालयात भांडणाऱ्या पत्नीला क्रूर म्हटले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई
राकेश घानोडे / नागपूर
स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी पतीविरुद्ध न्यायालयात भांडणाऱ्या पत्नीला क्रूर म्हटले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
प्रकरणातील पतीचे विवाहबाह्य संबंध असून, तो पत्नीचा हुंड्यासाठी छळ करीत होता. त्यामुळे ती पतीपासून वेगळी राहायला लागली. याचदरम्यान पत्नीने सासरच्या घरात राहण्याचा अधिकार व पोटगी मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात दाखल केलेली याचिका मंजूर झाली. त्यानंतर या वादाबाबत वर्तमानपत्रांत बातम्या प्रकाशित झाल्या. या बातम्या पत्नीनेच प्रकाशित करून घेतल्या असे पतीचे म्हणणे होते. त्याने पत्नीची ही कृती क्रूरतेत मोडणारी असल्याचा दावा करून या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती.
कुटुंब न्यायालयाने २२ जुलै २०१३ रोजी ही याचिका फेटाळून लावली. या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हे अपील फेटाळून पत्नीने स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागणे म्हणजे क्रूरता नव्हे, असे स्पष्ट केले. तसेच, पत्नीने पतीसोबतच्या वादाच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशित केल्याचा आरोप पुरावे नसल्याने सिद्ध झाला नाही.