कुस्ती मानांकन मालिका :महाराष्ट्राच्या राहुल आवारेने मारले मैदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 08:52 PM2019-07-13T20:52:13+5:302019-07-13T20:55:47+5:30
महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या शिखर संघटनेतर्फे आयोजित ‘यासर दोगू कुस्ती मानांकन मालिका २०१९’या स्पर्धेत शनिवारी मैदान मारताना सुवर्णपदकाला गवसणी घातली.
पुणे : महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या शिखर संघटनेतर्फे आयोजित ‘यासर दोगू कुस्ती मानांकन मालिका २०१९’या स्पर्धेत शनिवारी मैदान मारताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्यासह सीमा आणि मंजूकुमारी या महिला मल्लांनीही भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.
तुर्कस्थानची राजधानी इस्तंबूल येथे ही स्पर्धा सुरू आहे. राहुलने ६१ किलो वजन गटामध्ये बाजी मारली. अंतिम फेरीत त्याने यजमान तुर्कस्थानचा मल्ल मुनीर अख्तास याच्यावर ४-१ असे सहजपणे वर्चस्व गाजविले. या मानांकन मालिकेतील राहुलचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.यावेळी राहुल आवारे म्हणाला की, या स्पर्धेमुळे नवा आत्मविश्वास मिळाला आहे. यात खेळणारे खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्धी असतात. त्यांना नमवून या मालिकेतील पहिले सुवर्ण जिंकल्यामुळे मी स्वत:च्या कामगिरीवर समाधानी आहे. आता दिल्लीत होणाऱ्या जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे.
याच वयोगटात महाराष्ट्राच्याच उत्कर्ष काळे याला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.सीमा हिने ५० किलो तर मंजूकुमारी हिने ५९ किलो वजनगटामध्ये अव्वल स्थान पटकावत या स्पर्धेतील भारतीय संघाची सुवर्णपदकसंख्या ३ वर नेऊन ठेवली. ५० किलो गटाच्या अंतिम फेरीत सीमाने रशियाच्या व्हॅलेरिया चेपसाराकोवा हिची झुंज ३-२ अशी निसटत्या फरकाने मोडून काढली. मंजूने ५९ किलो गटाच्या निर्णायक लढतीत बेलारूसच्या कॅ त्सिरायना यानुशकेविच हिचा १३-२ असा सहजपणे धुव्वा उडविला कांस्यपदकविजेती साक्षी मलिक तसेच पूजा धांडा यांनी मात्र निराशा केली. त्यांना पदकापासून वंचित राहावे लागले.