सुजाण माणसे कशाला हिटलरच्या मागे जातील? अरुणा ढेरे यांच्याकडून दिब्रेटो यांच्या मताचे खंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 05:44 PM2020-01-11T17:44:45+5:302020-01-11T17:50:04+5:30
फ्रान्सिस दिब्रेटो यांनी जेएनयूमधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं मत व्यक्त केले होते.
९३ वे अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरू आहे. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपल्या भाषणात देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं होतं. यावर मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी विरोधी मत व्यक्त केले आहे.
फ्रान्सिस दिब्रेटो यांनी जेएनयूमधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं मत व्यक्त केले होते. यावर देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्वजण सुजाण नागरिक आहेत,' असं मत अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी मांडले. तसेच साहित्यिकांवर कोणताही दबाव नसल्याचे देखील अरुणा ढेरे यांनी एका वृत्तवाहिनील्या दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर आम्ही मुळीच शांत बसणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं असा सवाल फ्रान्सिस दिब्रेटो यांनी उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे गौरी लंकेश, नरेंद्र दाभोलकर यांना ठार करण्यात येतं ही कोणती भारतीय संस्कृती असल्याचे सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच देशात वाढत चाललेली बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग आणि ढासळत असलेली अर्थव्यवस्था हे मुख्य प्रश्न आहेत असं म्हणत त्यांनी याबाबतची खंतही फ्रान्सिस दिब्रेटो यांनी व्यक्त केली होती.