लेखक-प्रकाशकांचे संबंध अतिशय गलिच्छ

By admin | Published: April 20, 2016 12:57 AM2016-04-20T00:57:16+5:302016-04-20T00:57:16+5:30

लेखकाच्या बुडाखाली प्रकाशकांनी दिलेला अंधार आहे. लेखकाच्या किती आवृत्त्या प्रकाशित झाल्या, त्याची साधी माहितीच काय पण पैशाचा हिशोबही प्रकाशकांकडून लेखकाला दिला

Writer-publisher's relationship is very dirty | लेखक-प्रकाशकांचे संबंध अतिशय गलिच्छ

लेखक-प्रकाशकांचे संबंध अतिशय गलिच्छ

Next

पुणे : लेखकाच्या बुडाखाली प्रकाशकांनी दिलेला अंधार आहे. लेखकाच्या किती आवृत्त्या प्रकाशित झाल्या, त्याची साधी माहितीच काय पण पैशाचा हिशोबही प्रकाशकांकडून लेखकाला दिला जात नाही, असा आरोप करीत ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी मराठीतील लेखक आणि प्रकाशकांचे संबंध गलिच्छ आहेत, अशा शब्दांत प्रकाशकांवर तोफ डागली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘मसाप कट्ट्या’चे उद्घाटन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते मंगळवारी झाले. पहिले पुष्प राजन खान यांच्या मुलाखतीमधून गुंफण्यात आले. नीलिमा बोरवणकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते.
खान म्हणाले, ‘‘लेखकांच्या बुडाखाली याच प्रकाशकांनी दिलेला अंधार आहे. लेखकांच्या पुस्तकाच्या किती आवृत्त्या गेल्या, याचा हिशेब दिला जात नाही. मराठी साहित्यामध्ये प्रकाशक केवळ पैसे कमाविण्यासाठी आले आहेत. मराठी साहित्य उन्नत करायचे असेल, तर मराठीमध्ये आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक झाले पाहिजेत. साहित्यिक आणि प्रकाशकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी परिषदेने पुढाकार घ्यावा.’’ साहित्य संमेलनाविषयी भाष्य करताना ते म्हणाले, ‘‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वार्षिक बाजार भरतो, त्याला माझा पाठिंबाच आहे. या संमेलनामध्ये वाद, राडा होतो, पण होऊ दे. जोपर्यंत कुणाचा खून होत नाही तोपर्यंत संमेलन बंद व्हायला पाहिजे, असे मी म्हणणार नाही, कारण ‘साहित्य’ या शब्दाने माणसाचे किमान लक्ष्य तरी साहित्याकडे केंद्रित होते.’’(प्रतिनिधी)
> ई-बुकला माझा नेहमीच विरोध आहे. मला न विचारता एका ई-बुक संकेतस्थळावर माझे पुस्तक टाकण्यात आले आहे. हा कॉपीराईटचा भंग असल्याने ई-बुक प्रकाशक आणि संकेतस्थळावर दावा दाखल करणार असल्याचे सूतोवाच राजन खान यांनी केले.
या पृथ्वीवर अद्याप स्वत:चे घर नाही, हे एक अपुरे राहिलेले स्वप्न आहे. ६५ पुस्तके नावावर असलेल्या लेखकाकडे स्वत:चे घर नाही. ते स्वप्न पूर्णही होणार नाही. या स्वप्नपूर्तीसाठी तडफडत लिहीत राहिलो. पण हेच अपूर्ण स्वप्न जगण्याची उमेद देते. ते पूर्ण होऊ नये, असेच वाटते.
विषय सुचणे ही उत्स्फूर्त गोष्ट आहे. मी लिहिण्याला सुरूवात करतो पुढे तो विषय ठरवतो. लघुकथा लिहायला जातो आणि होतात त्याच्या दीर्घकथा. मुळात ही लघु, दीर्घ, लघुत्तम अशी मांडणीच मला मान्य नाही.

Web Title: Writer-publisher's relationship is very dirty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.