साहित्य संमेलनात लेखकांना मिळणार ‘मानाचं पान’; विविध साहित्य प्रकारांतील ५० पुस्तकांचे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 07:23 IST2025-01-06T07:21:24+5:302025-01-06T07:23:30+5:30
तीन दिवस प्रत्येक लेखकाला ठराविक वेळ देत प्रकाशन कट्ट्यावर बोलावून मान्यवरांच्या हस्ते पुस्तके प्रकाशित करण्यात येणार

साहित्य संमेलनात लेखकांना मिळणार ‘मानाचं पान’; विविध साहित्य प्रकारांतील ५० पुस्तकांचे प्रकाशन
स्वप्नील कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्वत:चे पुस्तक प्रकाशित व्हावे, ही प्रत्येक लेखकाची इच्छा असते. मात्र, ते जर साहित्य संमेलनात प्रकाशित झाले, तर तो त्या लेखकासाठी अविस्मरणीय क्षण ठरतो. पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखकांना ‘मानाचे पान’ मिळणार असून, तब्बल ५० लेखकांची विविध साहित्य प्रकारातील पुस्तके संमेलनादरम्यान प्रकाशित करण्यात येणार आहेत.
हा दुग्धशर्करा योग जुळून आणलाय संमेलनाची आयोजक संस्था ‘सरहद’ने. याबद्दल माहिती देताना साहित्य संमेलन आयोजक संस्था ‘सरहद’चे प्रमुख संजय नहार यांनी सांगितले की, दिल्लीतील साहित्य संमेलनात राज्यातील विविध भागातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आमच्याकडे इतर प्रकाशकांकडून २५ आणि ‘चपराक’ प्रकाशनाचे २५ असे ५० प्रस्ताव आले आहेत. संमेलनामध्ये एका पुस्तक प्रकाशन कट्ट्याचे नियोजन करण्यात येणार आहे. संमेलनादरम्यान तीन दिवस प्रत्येक लेखकाला ठराविक वेळ देत प्रकाशन कट्ट्यावर बोलावून मान्यवरांच्या हस्ते पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.
विषयांचे वैविध्य हेच वैशिष्ट्य
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित होणं, हा लेखकांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सन्मान असतो. या पुस्तकांमध्ये विषयांची वैविध्यता आहे. मराठी भाषेतील वैविध्य भारतासमोर दाखवण्याची ही संधी आहे. यामुळे नवीन लेखकांची आणि विषयांची यानिमित्ताने ओळख होईल.
‘चपराक’ने वैविध्यपूर्ण विषय आणि पुस्तके निवडली आहेत. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांची नाटकावरील तीन महत्त्वाची पुस्तके प्रकाशित करणार आहोत. कवी अनंतराव घोगले यांचा मोडी आणि मराठीमधील कवितांचा पहिला द्विभाषिक कवितासंग्रह आहे. सुहास कोळेकर, संदीप वाकचौरे, जे. डी. पराडकर, चंद्रलेखा बेलसरे, जनार्दन देवरे, हिरालाल पगडाल आदींची प्रवासवर्णने, कथासंग्रह, कादंबरी, बालसाहित्य आदी पुस्तके प्रकाशित होणार आहेत.
- घनश्याम पाटील, संपादक, चपराक, पुणे