पोलीस भरतीसाठी आज लेखी परीक्षा
By admin | Published: May 29, 2016 02:04 AM2016-05-29T02:04:10+5:302016-05-29T02:04:10+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुंबई पोलीस दलातील भरतीचा रविवारी महत्त्वाचा अंतिम टप्पा पार पडत आहे. शारीरिक चाचणीतून पात्र ठरलेल्या २८ हजार ४४५ उमेदवारांचा लेखी परीक्षा
मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुंबई पोलीस दलातील भरतीचा रविवारी महत्त्वाचा अंतिम टप्पा पार पडत आहे. शारीरिक चाचणीतून पात्र ठरलेल्या २८ हजार ४४५ उमेदवारांचा लेखी परीक्षा होणार असून, त्यासाठी शहर व उपनगरातील ८९ शाळा, महाविद्यालयांना परीक्षा केंद्र बनविण्यात आलेले आहे.
राज्य पोलीस दलातील विविध ६१ घटकांमध्ये शिपायाची ४ हजार ८३३ पदांची ‘मेगाभरती’ सुरू आहे. त्यापैकी सर्वाधिक १२७५ पदे मुंबईत असल्याने या ठिकाणी भरती होण्यासाठी तब्बल १ लाख ५२ हजार ७९ जणांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यामध्ये तरुणींची संख्या ३३ हजार ६२३ इतकी होती.
छाननीतून १ लाख ४४ हजार ७८० अर्ज पात्र ठरले होते. मात्र प्रत्यक्ष कागदपत्रांच्या छाननीत ६० हजार उमेदवारांनी हजेरी लावली. मरोळ, विक्रोळी, वरळी व नायगाव येथील पोलीस मैदानावर ५ एप्रिल ते ६ मे या कालावधीत शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. शारीरिक चाचणीतून प्रवर्गनिहाय पदानुसार निश्चित केलेल्या गुणवत्ता यादीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार, गोंधळ होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त दत्ता पडलगीकर यांनी दिले आहेत. त्यानुसार भरती निवड समितीचे अध्यक्ष व सहआयुक्त (प्रशासन) अनुपसिंग हे स्वत: देखरेख करीत असून, शहर व उपनगरातील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
- शंभर गुणांचा पेपर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार असून, या वेळी कोणताही गैरप्रकार
न होण्यासाठी १५००वर अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहे. शनिवारी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर बंदोबस्ताची चाचणी घेण्यात आली.