चुकीच्या उत्तराचा उमेदवारांना फटका; MPSC कडून प्रश्नाच्या उत्तरात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 06:45 AM2022-07-07T06:45:42+5:302022-07-07T06:46:00+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आयोगाच्या जुन्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा आणि त्याच्या उत्तरतालिकांचा अभ्यास केला जात असतो.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आली. आता ‘एमपीएससी’च्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा ९ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. मात्र आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या उत्तरतालिकेतील प्रश्नाच्या चुकीच्या उत्तरामुळे राज्याच्या विविध भागातून मुख्य परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी त्यामुळे अपात्र ठरले असून, परीक्षेला मुकणार आहेत. या विद्यार्थ्यांना आता परीक्षा तर देता येणार नाहीच, मात्र किमान आयोगाने यापुढे तरी आपल्या तज्ज्ञ समितीकडून परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कायम ठेवली जावीत आणि कोणत्या आधारावर ती योग्य आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी संतप्त उमेदवारांमधून होत आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आयोगाच्या जुन्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा आणि त्याच्या उत्तरतालिकांचा अभ्यास केला जात असतो. अशावेळी २०१३ च्या परीक्षेतील एका प्रश्नाचे उत्तर आणि २०२२ च्या परीक्षेतील त्याच प्रश्नाचे उत्तर दुसरे कसे काय शकते, असा प्रश्न महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा दिलेल्या आणि मुख्य परीक्षा अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या उत्तरतालिकेतील प्रश्नाचे, उमेदवारांच्या उत्तराशी विसंगत आल्याने हजारो विद्यार्थी ९ जुलैपासून सुरू होणाऱ्या मुख्य परीक्षेला मुकणार आहेत. या विरोधात जवळपास ५२ ते ५३ उमेदवारांनी औरंगाबाद मॅटमध्ये याचिका दाखल केली, मात्र त्याचा निकाल आयोगाच्या बाजूने लागला तर मुंबईत ३९ उमेदवारांनी याचिका दाखल करूनही त्यांना अद्याप हायकोर्टाच्या सुनावणीची तारीख मिळालेली नाही. यामुळे विद्यार्थी हताश झाले असून, आयोगाच्या चुकीमुळे हजारो विद्यार्थी संधी गमावून बसणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
आयोगाच्याच उत्तरतालिकांमध्ये तफावत आढळणार असेल आणि तरी ते योग्यच असेल तर मग जे तज्ज्ञ प्रश्न काढतात ते खरंच तज्ज्ञ आहेत का, असा प्रश्न उमेदवारांना पडणे साहजिकच आहे. शिवाय उमेदवारांच्या हरकतींवर योग्य न्याय द्यायचा नसेल तर उत्ररतालिका १ किंवा उत्तरतालिका २ हे प्रकार रद्द करून यूपीएससीच्या धर्तीवर निकाल जाहीर करावा. आयोगाने सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. - महेश बडे, एमपीएससी स्टुडण्ट्स राईट्स