गणित संख्यावाचनाचा निर्णय चुकीचा; तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 02:41 AM2019-06-19T02:41:11+5:302019-06-19T06:50:41+5:30

भाषेशी तडजोड करणे हा मराठी भाषेवर अन्यायच; भाषा संपविण्याच्या प्रयत्नावर नाराजी

Wrong decision of mathematical calculation; Expert opinion | गणित संख्यावाचनाचा निर्णय चुकीचा; तज्ज्ञांचे मत

गणित संख्यावाचनाचा निर्णय चुकीचा; तज्ज्ञांचे मत

Next

मुंबई : बालभारतीने अभ्यासक्रमात बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकात मोठा बदल केला आहे. संख्येचे वाचन करताना आता तेवीसऐवजी वीस तीन, पंचावन्नऐवजी पन्नास पाच असे वाचण्याच्या सूचना नमूद केल्या आहेत. या बदलांवर शिक्षण व मराठीविषयक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली असून, मराठी भाषा संपविण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय घेत असल्याचा सूर तज्ज्ञांमध्ये आहे.

निर्णयाचा पुनर्विचार होणे गरजेचे
गणित हा अवघड विषय आहे, गणिताची भीती विद्यार्थ्यांच्या मनात असते. उलट अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना गणित विषय आणखी अवघड जाणार आहे. असा निर्णय होणे हे अत्यंत खेदजनक आहे. शिक्षण क्षेत्रात इतके महत्त्वाचे बदल होत असताना, ज्याप्रमाणे शिक्षणतज्ज्ञांचा विचार लक्षात घेतला जातो, त्याप्रमाणे लहानग्यांच्या मानसशास्त्राच्या विश्लेषणासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचीही मते विचारात घेतली पाहिजेत. आधीच आपली शिक्षणपद्धती फारशी प्रगल्भ नाही, त्यात पुस्तकी अभ्यासाचा ८० टक्के समावेश आहे. त्यामुळे हे बदल स्वीकारणे लहानग्यांना खूप जड जाणार आहे. स्पर्धेच्या युगात मूल मागे पडू नये, म्हणून आधीच लहानग्यांना अभ्यास, शिकवणी आणि छंद-आवडीचे क्लासेस, यामुळे ताण सहन करावा लागतो. याची तीव्रता पालकांपर्यंत पोहोचत नाही. सर्व स्थितीचा विचार करता, या निर्णयाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे.
- डॉ.राजश्री लोहिया, मानसोपचारतज्ज्ञ

मराठी भाषा मारण्याचा कट
नवीन बालभारती पुस्तकातील पाढ्यांची भाषा बदलून मराठी भाषा मारण्याचा कट या सरकारचा आहे. भाषेचे इंग्रजीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे मराठी भाषेवर आलेले भयंकर संकट आहे. मराठी भाषेचा पाढा बदलून टाकायचा आणि मराठी संस्कृती मारून टाकायची, असा विचार असल्याचे दिसून येत आहे. ही कल्पना कुणाच्या डोक्यात आली, याचा शोध घ्यायचा आहे. अनेक भाषातज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली; परंतु हे नवीन शास्त्र हे कोणत्याच मराठी संस्कृतीत बसत नाही. शिक्षणामध्ये जे विनोद झाले, त्याचे नवीन आव्हान आता नव्या शिक्षणमंत्र्यावर आहे. पाढा बदलायचा म्हणजे मराठी संस्कृती मारायची, असे होते. सगळे बदलायचे आहे तर मराठी फेकून द्या, असेच यांचे धोरण आहे. बालभारतीची नवीन कितीही पुस्तके असली, तरी ती फेकून द्यावी, कितीही खर्च झाला, तरी चालेल कारण संख्यांचे उच्चार बदलणे हे चुकीचे आहे.
- कपिल पाटील, आमदार

यशापयश लगेचच ठरवणे अयोग्य
मागील वर्षी इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके बदलली होती. त्यातील गणिताच्या पाठ्यपुस्तकात २१ पासून (पान नं ४९ ते ५७) ९९ पर्यंतच्या अंक ओळख करून देताना तीन पद्धतींचा वापर केला आहे. मागील वर्षी या नवीन पद्धतीची ओळख दिली असताना, कोणतीही चर्चा अथवा गदारोळ झाल्याचे आठवत नाही. यंदा इयत्ता दुसरीचीही पाठ्यपुस्तके बदलली आहेत. गणिताच्या पाठ्यपुस्तकातील पान नं १० वर ‘संख्या वाचू- लिहू या’ यात २१ ते १०० संख्यांचे अक्षरी लेखन दिले आहे. त्यात दोन प्रकारचे संख्यावाचन दिले आहे. यंदा झालेला बदल हा एकाएकी झालेला नसून मागील वर्षी झालेल्या बदलावर आधारित आहे. या पद्धतीला होणाऱ्या विरोधाचे आणखी एक महत्त्वाचे कारण दिले जाते की, व्यवहारात किंवा समाज जीवनात इतर लोक प्रचलित पद्धतीचाच वापर करतील, तर या नवीन पद्धतीने शिकणारी मुले गोंधळात पडतील. विद्यार्थ्यांना या पद्धतीने संख्यांची ओळख होणे व ती पक्की करणे हाच उद्देश दिसून येतो. त्यांनी व्यवहारातही याच पद्धतीचा अवलंब करावा, असे अपेक्षित नाही. या नवीन पद्धतीचे यशापयश लगेचच ठरविणे योग्य होणार नाही, त्यासाठी हे शैक्षणिक वर्ष पार पडणे आवश्यक आहे. त्यानंतरच विद्यार्थी व शिक्षकांच्या अनुभवावरून हा निर्णय योग्य की अयोग्य, ते सांगणे उचित ठरेल.
- नितीन खंडाळे, शिक्षक

उच्चार बदलण्याची गरज नाही
संबंधित अधिकाऱ्यांनी बुद्धी, मन आणि मत याचा निर्णय घेताना अजिबात विचार केलेला नाही. मुळात अशा पद्धतीने कोणतीही भाषा शिकविली जात नाही. मूळ स्वरूप शिकविताना बदलता येत नाही. शिक्षणाचा मूळ उद्देशच असा आहे की, त्या-त्या काळात, त्या-त्या स्वरूपात विषयांचे शिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी उच्चार बदलण्याची काहीच आवश्यकता नसते. परकीय भाषा शिकताना आपल्याला जमत नसेल, तर आपण त्याचे स्वरूप बदलतो का, तर असे करत नाही. त्याप्रमाणेच, आपल्या भाषांमध्ये तडजोड करणे हे अस्मिता शिल्लक असलेल्या देशाला शोभनीय नाही. शिक्षणाचा खेळखंडोबा करणारा अत्यंत चुकीचा निर्णय आहे.
- चंद्रशेखर टिळक, अर्थतज्ज्ञ

दिलेले कारण फारच तकलादू
जोडाक्षरे उच्चारणे विद्यार्थ्यांना जमत नाही, हे बदलासाठी दिलेले कारण फारच तकलादू आहे. संख्या वाचनातील जोडाक्षरांचे प्रमाण शालेय अभ्यासक्रमातील व पाठ्यपुस्तकातील एकूण जोडाक्षरांच्या तुलनेत लाखात एक या प्रमाणाहून कमी आहे. सुचविलेली नवी पद्धत अधिक गुंतागुंतीची, अवघड व अधिक वेळखाऊ आहे. या संख्येचे वाचन पुढील वरच्या इयत्तेतील मुलांनी कसे करावे, याबाबात गणित अभ्यास मंडळाचे काय मत आहे? संख्या वाचन न करता अन्य पद्धतीने करावे, असा निर्णय घेण्याचा सल्ला देण्याबाबतचे अधिकार गणित अभ्यास मंडळाला आहेत का? याचा प्राथमिक आढावा घेतला असता, उपरोक्त गणित अभ्यास मंडळाला असा अधिकार दिलेला नसावा, असे अनेक शासकीय अधिकाºयांचे मत आहे. भाषातज्ज्ञांशी असा औपचारिक विचारविनिमय न करताच इतका मूलभूत बदल केला असेल, तर तो बदल तातडीने स्थगित कारावा आणि या संबंधीचा आशय पाठ्यपुस्तकातून वगळण्याचे परिपत्रक (शुद्धिपत्रक) तातडीने काढावे, अशी मागणीही शासनाकडे केली आहे.
- रमेश पानसे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

बदलामुळे नेमके काय साध्य होणार?
बालभारतीच्या वतीने दुसºया इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला. या अभ्यासक्रमात जोडाक्षरे उच्चार करण्यास कठीण असतात, म्हणून त्याची उच्चार पद्धतीच बदलून टाकली आहे. एकवीस, बावीस या उच्चाराऐवजी आता वीस एक, वीस दोन असा शब्दप्रयोग करण्यास सांगितले आहे. मुळात भाषेत जोडाक्षरांना फारच महत्त्व आहे. जोडाक्षरे, स्पष्ट उच्चारण, शब्दांचे चढ-उतार ही भाषेची मूलभूत अंगे शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर शिकविली जातात. दुसरीच्या वर्गातच भाषेची भीती मुलांमध्ये निर्माण केली, तर तो शुद्ध भाषा शिकायला तयारच होणार नाही. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या अभ्यास पद्धतीत बदल करण्यास काहीच हरकत नाही. शिक्षणात व शिक्षण पद्धतीत बदल हा
झालाच पाहिजे, परंतु हा बदल सकारात्मक अपेक्षित आहे. बालभारतीने दुसरी इयत्तेत केलेल्या बदलामुळे नेमके काय साध्य होणार आहे? असा प्रश्न शिक्षक व पालकांना पडला आहे. आकडेमोड करताना व पाढे पाठ करताना जुनी पद्धत अयोग्य होती का? बालभारतीच्या वतीने करण्यात आलेले बदल गणितीय पद्धतीचा विचार केला असता, भाषिक विचार हा संभ्रमात टाकणारा प्रश्न ठरतो. मुळात लहाणपणी मूल कोणतीही भाषा लवकर आत्मसात करतो. श्रवण, वाचन, भाषण, आकलन या चार भाषिक अंगाच्या विकासासाठी भाषा तज्ज्ञांनी या बदलांवर विचार करणे आवश्यक आहे.
- उदय नरे, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई

Web Title: Wrong decision of mathematical calculation; Expert opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.