चुकीची नेत्र शस्त्रक्रिया : आणखी दोघे निलंबित
By admin | Published: November 14, 2015 02:16 AM2015-11-14T02:16:04+5:302015-11-14T02:16:04+5:30
२३ रुग्णांवर कायमस्वरूपी अंधत्व पत्करण्याची आली होती वेळ.
वाशिम: मोतीबिंदूची चुकीच्या पद्धतीने नेत्र शस्त्रक्रिया केल्यानंतर जंतुसंसर्ग झाल्यावरही योग्य उपचार न केल्यामुळे २३ रुग्णांवर कायमस्वरूपी अंधत्व पत्करण्याची वेळ आली होती. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक व नेत्रतज्ज्ञांना निलंबित केल्यानंतर पुन्हा दोन नेत्ररोग चिकित्सकांना निलंबित करण्यात आले. येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात १५ ऑक्टोबर रोजी आयोजित एका शिबिरामध्ये २३ पेक्षा जास्त रुग्णांवर नेत्ररोग तज्ज्ञांमार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली; मात्र ही शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आठ रुग्णांना डोळे गमवावे लागले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांवर आंधळे होण्याची पाळी आल्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले. वाशिम जिल्ह्यातील आमदार राजेंद्र पाटणी, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व आरोग्यमंत्री सावंत यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. या गंभीर प्रकरणाची आरोग्य मंत्रालयाने दखल घेत याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात केली. या प्रकरणात दोषी असलेल्या आणखी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय पुढार्यांनी केली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीत दोषी आढळलेले वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्ररोग चिकित्सक जगदीश बाहेकर व हाके यांना निलंबित करण्यात आले. याप्रकरणी आता चार जणांना निलंबित करण्यात आले आहे.