चुकीचा इतिहास अस्वस्थ करणारा
By admin | Published: June 22, 2017 05:16 AM2017-06-22T05:16:04+5:302017-06-22T05:16:04+5:30
आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना अभिप्रेत असलेला इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. आजही विशिष्ट भूमिका समाजासमोर मांडण्याचे आणि तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना मिळणारे यश अस्वस्थ करते, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.
महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीतर्फे श्रीमंत कोकाटे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, लेखक श्रीमंत कोकाटे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, शिवरायांनी अफझल खानाच्या रूपात मुसलमानाचा नव्हे, तर शत्रूचा कोथळा बाहेर काढला. अत्याचार, अन्याय, आक्रमणाच्या विरोधात त्यांचा लढा होता. त्यामध्ये त्यांनी जातीधर्माचा विचार केला नाही. मात्र, त्यांचा संघर्ष जाणीवपूर्वक मुस्लिमांपुरता मर्यादित ठेवला गेला. महापुरुषांनी संघर्षाला धार्मिक स्वरूप येऊ दिले नाही. तरीही शाळेत छत्रपतींचा इतिहास वेगळ्या पद्धतीने शिकवला जातो. समाजासमोर इतिहासाची वास्तव मांडणी झाली पाहिजे. जातीवाचक विचार न करता राज्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त
केली.
आपण इतिहास लिहीत नाही, तोपर्यंत इतरांनी लिहिलेला इतिहास वाचावा लागतो. इतिहासाचे लेखन करताना काही मंडळी अडखळली तर त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहायला हवे, असे सांगून जयसिंगराव पवार म्हणाले, ‘आपल्या मनाला जे पटते ते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. इतिहासाची मांडणी, पुनर्मांडणी करताना सत्य संशोधनाला महत्त्व द्यायला हवे. पुरावे असतील तर सत्य कोणालाही खोडून काढता येत नाही.
‘गोब्राह्मण प्रतिपालक’ हा शब्दप्रयोग अनैतिहासिक असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक त्र्यंबक शेजवलकर यांनी सिद्ध केले. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना ‘कुळवाडी भूषण’ ही उपाधी दिली. शिवछत्रपतींचे राज्य कधीच भोसलेंचे नव्हते, तर ते रयतेचे होते. सज्जनांचे संरक्षण आणि दुष्टांचा नाश हे सूत्र त्यांनी पाळले. अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले, असे सांगत पवार यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडला.