मृतांच्या कपाळावर आकडे टाकणे चुकीचे, एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील प्रकारावरून हायकोर्टाचे ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 04:26 PM2017-12-14T16:26:20+5:302017-12-14T16:28:13+5:30
एल्फिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कपाळावर आकडे टाकण्याचा संतापजनक प्रकार घडला होता.
मुंबई - एल्फिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कपाळावर आकडे टाकण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकाराबद्दल आज हायकोर्टाने राज्य सरकारला खडेबोल सुनावताना मृतांच्या डोक्यावर आकडे टाकणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेबाबतच्या एका प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मृतांच्या कपाळावर आकडे टाकण्याच्या प्रकारावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी काढली. तसेच या प्रकाराचा जाब विचारणाऱ्यांवर गुन्हे का दाखल केले, अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली. मात्र शवविच्छेदन करताना डॉक्टरांनी डोक्यावर आकडे टाकले, असा दावा राज्य सरकारने केला.
दरम्यान, एल्फिन्स्टन रोडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.
२९ सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन रोडच्या पुलावर ही दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीत २३ जण मृत्युमुखी पडले. या मृतांचे शवविच्छेदन केईएम रुग्णालयात झाले. त्या वेळेस रुग्णालयातील डॉक्टरने मृतांच्या डोक्यावर मार्करने १ ते २३ आकडे टाकले. असे आकडे बहुतेकवेळा अतिरेकी अथवा गँगस्टरचे एन्काउंटर केल्यानंतर टाकले जातात, अशी संतापजनक प्रतिक्रिया मुंबईकरांमधून उमटली होती. त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केईएमच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. हरीश पाठक यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.