किल्ल्यांवर नावे कोरणे चुकीचे
By admin | Published: May 16, 2016 03:16 AM2016-05-16T03:16:07+5:302016-05-16T03:16:07+5:30
प्रेमीयुगुलांकडून गड-किल्ल्यांवर नावे कोरली जाणे हा प्रकार दुदैवी
नवी मुंबई : प्रेमीयुगुलांकडून गड-किल्ल्यांवर नावे कोरली जाणे हा प्रकार दुदैवी असून अशा प्रकाराला सडेतोड उत्तर देण्याची गरज हिंदू जनजागृती समितीचे वक्ते सुमित सागवेकर यांनी व्यक्त केली आहे. गडसंवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याने तसे कृत्य करणाऱ्यांना थांबवले जाण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. एपीएमसी येथे धर्मवीर संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्ताने तुर्भे येथे आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित होते.
धर्मवीर संभाजी राजे उत्सव मंडळाच्या वतीने एपीएमसी येथे धर्मवीर संभाजी राजे यांची ३५९ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित महापौर सुधाकर सोनवणे यांनी संभाजीराजांचा इतिहास शाळांमधून पहिलीपासूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची गरज व्यक्त केली. तर हिंदू जनजागृती समितीचे वक्ते सुमित सागवेकर यांनी गड- किल्ल्यांच्या संवर्धनाची गरज व्यक्त केली. सध्याचे तरुण-तरुणी जोडीने पर्यटनाच्या निमित्ताने गड-किल्ल्यांच्या ठिकाणी जातात. मात्र तिथे गेल्यावर ऐतिहासिक वास्तूंवर दगडाने कोरून अथवा रंगाने स्वत:ची नावे लिहिण्याचा लज्जास्पद प्रकार करतात. ज्यांनी गड-किल्ले उभारले, त्याचे संवर्धन केले अशांनी कधी स्वत:ची नावे लिहिली नाहीत. परंतु सध्याचा तरुणवर्ग असा प्रकार करत असल्याने त्यांना अडवून सडेतोड उत्तर देण्याची गरज सागवेकर यांनी व्यक्त केली. असाच प्रकार सणांच्या बाबतीत होत असून काही जण हिंदू सणांचा वेगळ्या घटनांशी संबंध जोडून अपप्रचार करण्याचे काम करीत आहेत. मात्र संस्कृतीला गालबोट लागेल असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचाही इशारा त्यांनी तुर्भे येथे कार्यक्रमात दिला. याप्रसंगी क्रीडा समिती सभापती प्रकाश मोरे, सोपान मेहेर, गणेश म्हांगरे, शंकर पिंगळे, विलास ताजणे, गणेश पावगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)