इंग्रजांनी लिहिलेला इतिहास चुकीचा
By Admin | Published: January 7, 2017 01:10 AM2017-01-07T01:10:13+5:302017-01-07T01:10:13+5:30
इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास लिहून मराठ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले
वाघोली : अठरापगड जाती असलेल्या मराठ्यांच्या कर्तबगारीचा इतिहास जगाला कळू नये म्हणून इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास लिहून मराठ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले, असे प्रतिपादन ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ‘१८व्या शतकातील मराठी सत्तेचा विस्तार’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन वाघोली येथे करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मोरे बोलत होते.
सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज रामचंद्र जाधवराव, प्राचार्य नंदकुमार निकम, शांतीलाल बोरा, प्राचार्य बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य किशोर देसरडा, इतिहास विभागप्रमुख भूषण फडतरे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले की, अठरावे शतक हे पूर्णपणे मराठ्यांच्या कर्तबगारीचे होते. मात्र, याची दखल कोणीही घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर अठरापगड जाती असलेला मराठा समाज चवताळून निघाला होता. चोवीस तास लढाई करून मराठ्यांनी दक्षिण प्रांताबरोबरच उत्तरेकडील तख्तदेखील काबीज केले. या काळामध्ये मराठा समाजाची दहशत मुघलांमध्ये निर्माण झाली होती.’’
ते म्हणाले, ‘व्यवसाय करण्यासाठी अनेक समाजातील नागरिक स्थलांतर करीत असतात. परंतु इतर राज्य काबीज करून चालविण्यासाठी जाणारे एकमेव मराठे होते. इंग्रजांनी भारतात पाय रोवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना सर्वाधिक धोका मराठ्यांकडून होता. त्यामुळे मराठे स्वकीयांची कशा प्रकारे पिळवणूक करीत आहे याचे चित्र मांडले. स्वत:च्या फायद्यासाठी इंग्रजांनी केलेल्या या कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठ्यांची बदनामी होत आहे. मराठे स्वकियांशी लढले अशी परिस्थिती दाखवीत असताना मराठे स्वकियांशी का लढले, याचे कारण मात्र अधांतरीत ठेवण्यात येते. सूत्रसंचालन सहदेव चव्हाण यांनी केले. आभार रूपाली गुलालकारी यांनी मानले.
>शासनाची १२ लाखांची मदत
इंग्रजानंतर भारतातील इतिहासकरांनी इतिहास लिहिला. परंतु समग्र मराठा इतिहास लिहिण्याऐवजी विशिष्ट जातीवर इतिहास लिहिले गेले. त्यामुळे समग्र मराठा इतिहास आजही लिहिला गेला नाही. महाराष्ट्राबाहेरील मराठा इतिहास लिहिण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १२ लाखांची मदत केली असल्याचे सदानंद मोरे यांनी सांगितले.
प्राचार्य नंदकुमार निकम म्हणाले की, पानिपतमध्ये मराठे हरले हे दाखविले जाते. परंतु मराठे कशा प्रकारे लढले, याची माहिती सांगितली जात नाही. मराठा उदात्तीकरण करण्यापेक्षा विश्लेषण करण्याची गरज आहे.
‘कर्नाटकात मराठी साम्राज्याचा विस्तार’ या विषयावर श्रीकांत रणदिवे यांनी, तर ‘पानिपतची मोहीम’ या विषयावर पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. नामदेवराव ढाले यांनी शोधनिबंधाचे वाचन केले.