XE व्हेरिएंट वेगाने पसरणारा; पण घाबरण्याची गरज नाही, वैद्यकीय तज्ज्ञांचा निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 06:27 AM2022-04-09T06:27:23+5:302022-04-09T06:27:46+5:30
ओमायक्रोनच्या बीए १ आणि बीए २ व्हेरियंटमध्ये बदल होऊन एक्सई हा विषाणू तयार झाला आहे. ब्रिटनमध्ये एक्सई हा व्हेरियंट १२ जानेवारी रोजी आढळला होता.
मुंबई :
ओमायक्रोनच्या बीए १ आणि बीए २ व्हेरियंटमध्ये बदल होऊन एक्सई हा विषाणू तयार झाला आहे. ब्रिटनमध्ये एक्सई हा व्हेरियंट १२ जानेवारी रोजी आढळला होता. जगभरात या व्हेरियंटचे सहाशेहून अधिक रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आतापर्यंत आढळून आलेल्या व्हेरियंटपेक्षा एक्सई हा सर्वाधिक वेगाने पसरणारा आहे, मात्र या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नसल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एक्सई’ हा वेगळा व्हेरियंट नाही. तो ओमिक्रॉन या व्हेरियंटाचाच भाग आहे. ओमिक्रॉनची ‘बीए-१’ आणि ‘बीए-२’ यांच्या मिश्रणातून हा तयार झाला आहे. आपल्याकडे कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनमुळे आली होती. त्यामुळे आता या व्हेरियंटमुळे नवीन कोणताही लाट येऊ शकत नाही. प्रत्येक विषाणूंमध्ये जनुकीय बदल होत असतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ‘एक्सई’ हा त्याच प्रक्रियेचा भाग आहे.
भविष्यातही कोरोनाचे नवे व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. मात्र लसीकरण पूर्ण झाले असल्याने सुरक्षा कवच निर्माण झाले आहे, त्यामुळे आजाराची तीव्रता कमी होत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता खबरदारी घ्यावी, असे कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.
सर्वप्रथम ब्रिटनमध्ये नोंद
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोविडचे आतापर्यंत तीन हायब्रीड वा रिकॉम्बिनेंट स्ट्रेन आढळले आहेत. पहिला एक्सडी, दुसरा एक्सएफ आणि एक्सई हा तिसरा व्हेरिएंट आहे. यातील पहिल्या आणि दुसऱ्या व्हेरिएंटची उत्पत्ती डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या मिश्रणातून झाली आहे. तर एक्सई हा ओमिक्रॉन सब व्हेरिएंटचा हायब्रीड स्ट्रेन आहे. सर्वप्रथम १९ जानेवारी रोजी ब्रिटनमध्ये या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला.
‘त्या’ अहवालातून होणार स्पष्टता
- मुंबईत आढळलेल्या त्या रुग्णाचा जिनोमिक डाटा पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेने इंडियन सार्स सीओव्ही २ जीनोमिक्स कंसोर्टियम (आयएनएससीओजी) व त्यांनी पश्चिम बंगाल कल्याणी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स (एनआयबीएमजी) संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत.
- त्यांच्या अहवालातून हा रुग्ण एक्सई व्हेरियंटने बाधित होता का हे स्पष्ट होणार असल्याचे पालिकेचे मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले आहे.
आम्हाला हे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल संस्थेत पाठवण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे गुरुवारी ते पाठविण्यात आले. आता अंतिम विश्लेषणाची वाट पाहत आहोत.
- डॉ. जयंती शास्त्री,
प्रभारी जिनोम सिक्वेन्सिंग विभाग, कस्तुरबा रुग्णालय