बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर; तोंडी परीक्षेऐवजी आता 'अ‍ॅक्टिव्हिटी शीट' भर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:41 PM2020-09-16T13:41:43+5:302020-09-16T13:48:05+5:30

चालू शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

XII evaluation plan announced; Now fill in the 'Activity Sheet' instead of the oral test | बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर; तोंडी परीक्षेऐवजी आता 'अ‍ॅक्टिव्हिटी शीट' भर 

बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर; तोंडी परीक्षेऐवजी आता 'अ‍ॅक्टिव्हिटी शीट' भर 

Next
ठळक मुद्देतोंडी परीक्षाऐवजी आता 'ऍक्टिव्हिटी शीट'च्या माध्यमातून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले जाणार आराखड्यात विषय ज्ञान, आकलन आणि उपयोजनाला अधिक महत्त्व

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला असून व्यावहारिक कौशल्याची गरज लक्षात घेऊन या आराखड्यात विषय ज्ञान, आकलन आणि उपयोजनाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. तसेच तोंडी परीक्षेऐवजी आता उपयोजनात्मक चाचणी घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले जाणार आहेत.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासूनच या आराखड्याची अंमलबजावणी होणार आहे.
       इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. अभ्यासक्रमाबरोबरच बारावीच्या मूल्यमापन पद्धतही बदल करण्यात आला आहे. कला, वाणिज्य शाखेसाठी ८०/२० तर विज्ञान शाखेसाठी ७०/३० पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. परंतु, तोंडी परीक्षाऐवजी आता ' ऍक्टिव्हिटी शीट '  च्या माध्यमातून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले जाणार आहेत. 
विद्यार्थ्यांनी घोकंम पट्टी करून परीक्षेत उत्तरे लिहिण्याऐवजी वर्षभर घेतलेल्या ज्ञानाचे उपयोजन कसे करावे, यावर मूल्यमापन आराखडा तयार करताना लक्ष देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यातही काही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी विचारल्या जाणाऱ्या एक ,पाच आणि दहा गुणांच्या प्रश्नांऐवजी एक, दोन, तीन, चार ,पाच गुणांचे प्रश्न सुद्धा विचारले जाणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात  प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्नांचे प्रमाण सुमारे 25 टक्‍क्‍यांपर्यंत असणार आहे.
इयत्ता बारावीच्या इतिहास, भूशास्त्र, राज्यशास्त्र, बालविकास, वस्त्रशास्त्र, तर्कशास्त्र,अर्थशास्त्र ,पुस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन, चिटणीसाची कार्यपद्धती ,सहकार, कृषीविज्ञान, माहिती तंत्रज्ञान-विज्ञान, कला व वाणिज्य, शिक्षणशास्त्र, पर्यावरण व जलसुरक्षा या विषयांच्या सुधारित मूल्यमापन योजनेची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जाणार आहे. सुधारित मूल्यमापनाबाबत राज्य मंडळामार्फत विषय निहाय ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात विषय शिक्षकांना विषय निहाय मूल्यमापन आराखडे व अन्य तपशील अवगत करून दिला जाणार आहे.
--------------------------
एखादा विषय कळणे ,समजणे यापलीकडे जावून आता विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचे उपयोजन करता आले पाहिजे. त्यादृष्टीने मूल्यमापनात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. वाणिज्य शाखेतील काही विषयांसाठी विद्यार्थ्यांना ' केस स्टडी ' देवून त्यावर प्रश्न विचारले जातील. तसेच विचार करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळावी यासाठी १ ते ५ गुणांचे प्रश्न विचारले जातील.
- ज्योती गायकवाड, सदस्य, अभ्यासगट,बालभारती,पुणे
---------------------
मूल्यमापन आराखडा तयार करण्यात आला आहे. व्यावहारिक कौशल्यातील शिक्षणाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे उपयोजन करावे,यावर भर दिला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये वैविध्यता आणली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेत वाढ होईल. तसेच बदललेला आराखडा विद्यार्थ्यां ची व्यावहारिक कौशल्याची गरज भरून काढण्यासाठी आधार देईल.
-डॉ. रुपेसेन कांबळे, सदस्य अभ्यास मंडळ
---------------------
बदलेल्या मुल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्ञान,आकलन, उपयोजन आणि कौशल्य यावर भर दिला  आहे.वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रमाण वाढविल्याने विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनासाठी ऍक्टिव्हिटी शीट सोडविण्यास दिले जाणार आहे.विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने संपूर्ण अभ्यास करावा व त्यांची अभ्यासक्रम आकलनशक्ती वाढावी यावर भर दिला आहे.
- अविनाश ताकवले,अभ्यासगट सदस्य,बालभारती,पुणे

Web Title: XII evaluation plan announced; Now fill in the 'Activity Sheet' instead of the oral test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.