वाईच्या भाजपा नगराध्यक्षांना लाच घेताना अटक
By admin | Published: June 10, 2017 02:55 AM2017-06-10T02:55:55+5:302017-06-10T02:55:55+5:30
वाईच्या भाजपाच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे शिक्षक पती सुधीर शिंदे यांना शुक्रवारी ठेकेदाराकडून १४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई (जि. सातारा) : वाईच्या भाजपाच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे शिक्षक पती सुधीर शिंदे यांना शुक्रवारी ठेकेदाराकडून १४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
संबंधित ठेकेदाराने वाईमध्ये सार्वजनिक शौचालयाची कामे केली होती. त्या कामाचे १ लाख ४० हजार बिल काढण्यात आले होते. त्या काढलेल्या बिलाच्या मोबदल्यात तसेच उर्वरित कामाचे ८ लाखांचे प्रलंबित बिल काढण्यासाठी दहा टक्के प्रमाणे १४ हजार रुपयांची मागणी नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी ठेकेदाराकडे केली होती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार नोंदविली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
पती सुधीर शिंदे यांनी त्यांच्या दवाखान्यामध्ये संबंधित ठेकेदाराला पैसे घेऊन बोलावले होते. या वेळी स्वत: नगराध्यक्ष प्रतिभा शिंदेही तेथे हजर होत्या. संबंधित ठेकेदाराने १४ हजारांची रोकड सुधीर शिंदे यांच्या हातात देताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर लाचेची मागणी केल्यामुळे प्रतिभा शिंदे यांनाही तत्काळ अटक करण्यात आली.
शिंदे या पेशाने डॉक्टर असून, केवळ एक मताने भाजपाकडून थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, वाई नगरपालिकेत विरोधी राष्ट्रवादीच्या आघाडीची सत्ता आहे. त्यांचे पती द्रविड हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.