केंद्र सरकारकडून सदाभाऊ खोतांना आता Y दर्जाची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 03:04 PM2022-06-19T15:04:43+5:302022-06-19T15:05:51+5:30

Sadabhau Khot : गेल्या काही दिवसांमध्ये सदाभाऊ खोत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

Y level security for Sadabhau Khot from Central Government | केंद्र सरकारकडून सदाभाऊ खोतांना आता Y दर्जाची सुरक्षा

केंद्र सरकारकडून सदाभाऊ खोतांना आता Y दर्जाची सुरक्षा

googlenewsNext

मुंबई : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत  (Sadabhau Khot) यांना केंद्रीय गृहखात्याने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. केंद्रीय गृहखात्याने यासंदर्भात मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा दलांना आदेशाचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार सदाभाऊ खोत यांना रविवारपासून वाय दर्जाची सुरक्षा प्राप्त झाली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये सदाभाऊ खोत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. आढावा समितीची पुढील बैठक होईपर्यंत सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा लागू असेल, असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये जेवणाची उधारी थकल्यामुळे एका हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांना अडवल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी तो राष्ट्रवादीचा कार्यकर्त्या असल्याचा आरोप केला आणि आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. 

आतापर्यंत केंद्र सरकारने राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवली आहे. सदाभाऊ खोत यांना पुरवण्यात येणाऱ्या वाय दर्जाच्या सुरक्षा पथकात एकूण ११ सुरक्षारक्षक असतील. यामध्ये एनएसजीचे एक किंवा दोन कमांडो आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहखात्याने अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांनाही वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली होती.

आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा
दोन दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत हे पंचायतराज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 'हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा' असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांना अडवले होते. या प्रकारामुळे सदाभाऊ खोत चांगलेच अस्वस्थ झाले होते. याबाबत सदाभाऊ खोत म्हणाले होते की, "पंचायतराज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यासाठी सांगोल्यामध्ये आलो होतो. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अंगावर येण्याचाही प्रयत्न केला. जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रकार केला. हा प्रकार निषेधार्ह आहेच. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं आहे." तसेच सदाभाऊ खोत यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता.

राज्य सरकारकडूनही सुरक्षेत वाढ 
दरम्यान, राज्य सरकारनेही सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. सदाभाऊ खोत यांच्या जीवाला राष्ट्रवादीकडून धोका आहे, असे मला वाटत नाही. परंतु तरी सुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केलेली आहे. ती लक्षात घेता आणि त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले होते.

Web Title: Y level security for Sadabhau Khot from Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.