बंडखोर १५ आमदारांना केंद्राची वाय प्लस सुरक्षा, कुटुंबीयांना संरक्षण द्या - राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:12 AM2022-06-27T06:12:23+5:302022-06-27T06:13:09+5:30

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी कुटुंबांना दिलेली सुरक्षा राज्याच्या गृह विभागाकडून बेकायदा काढून घेतल्याचे सांगत कुटुंबांना संरक्षण देण्यास सांगितले आहे. काही राजकीय नेत्यांकडून आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेखही पत्रात आहे.

Y Plus security for 15 rebel MLAs, protect their families says Governor Bhagat Singh koshyari | बंडखोर १५ आमदारांना केंद्राची वाय प्लस सुरक्षा, कुटुंबीयांना संरक्षण द्या - राज्यपाल

बंडखोर १५ आमदारांना केंद्राची वाय प्लस सुरक्षा, कुटुंबीयांना संरक्षण द्या - राज्यपाल

Next

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची घरे, कार्यालयांवर हल्ले होत असतानाच त्यातील १५ आमदारांच्या कुटुंबीयांना केंद्राच्या अखत्यारितील वाय प्लस सुरक्षेसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे संरक्षण दिले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण द्या, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. 

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी कुटुंबांना दिलेली सुरक्षा राज्याच्या गृह विभागाकडून बेकायदा काढून घेतल्याचे सांगत कुटुंबांना संरक्षण देण्यास सांगितले आहे. काही राजकीय नेत्यांकडून आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेखही पत्रात आहे.

सीआरपीएफची सुरक्षा पुरविलेल्या १५ जणांमध्ये मंत्री संदीपान भुमरे, दादा भुसे, माजी मंत्री आ.संजय राठोड, आ. रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जयस्वाल, दिलीप लांडे, बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.

कोरोना निगेटिव्ह येताच राज्यपाल ॲक्टिव्ह
-  येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. 
-  राज्यपाल गेले चारपाच दिवस कोरोनाग्रस्त होते व खासगी इस्पितळात उपचार घेत होते. आज ते परत येताच ॲक्टिव्ह झाले. 
-  आमदारांच्या सुरक्षेचा विषय त्यांनी हाती घेतला. राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्षाचे अनेक प्रसंग घडले आहेत.

आमदार मुंबईत आल्यावरही मिळणार केंद्राची सुरक्षा
गुवाहाटीतील बंडखोर आमदार मुंबईत येतील तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठीदेखील केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तैनात करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विमानतळावर ते उतरल्यापासून ज्या हॉटेलवर त्यांचा मुक्काम असेल तिथे, ते विधानभवनात जातानादेखील सीआरपीएफ जवानांचा गराडा असेल.
 

Web Title: Y Plus security for 15 rebel MLAs, protect their families says Governor Bhagat Singh koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.