‘लोकमत’चे यदु जोशी रंगाअण्णा वैद्य पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:44 AM2017-09-19T04:44:06+5:302017-09-19T04:44:08+5:30
पत्रकारिता समाजाचा आरसा असून, त्यात खूप मोठी विश्वासार्हता आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना चुकीचे असेल तर लिहिलेच पाहिजे; मात्र स्पर्धेच्या घाईत कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले.
सोलापूर : पत्रकारिता समाजाचा आरसा असून, त्यात खूप मोठी विश्वासार्हता आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना चुकीचे असेल तर लिहिलेच पाहिजे; मात्र स्पर्धेच्या घाईत कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लोकमतचे विशेष प्रतिनिधी (मुंबई) यदू जोशी यांना पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य पुरस्काराने तर ज्येष्ठ पत्रकार संजय पाठक यांना स्व. बाबूराव जक्कल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी तावडे बोलत होते. हिराचंद नेमचंद येथील अॅम्फी थिएटर येथे झालेल्या सोहळ्यास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित होते.
पत्रकारिता ही एक मोठी जबाबदारी आहे. पत्रकारिता हे एक स्वीकारलेले व्रत असून, समाजव्यवस्थेवर प्रहार करताना सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे. ज्या बातमीत तथ्य आहे ती देऊन चुकीच्या गोष्टींवर आसूड ओढला पाहिजे. प्रामाणिक पत्रकारांची संख्या वाढली पाहिजे. शासन अनेक चांगल्या गोष्टी राबवत आहे, त्या समाजासमोर आणल्यास चांगल्या भावना निर्माण होतील. सकारात्मक बातम्या सर्वसामान्य जनतेचा आत्मविश्वास वाढवतात, असेही तावडे यांनी सांगितले.