याकूब मेमनचे दिवस अखेर भरले?
By admin | Published: July 16, 2015 05:32 AM2015-07-16T05:32:46+5:302015-07-16T05:32:46+5:30
मुंबईत मार्च १९९३मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेमागील मुख्य सूत्रधार याकूब अब्दुल रझाक मेमन याचे दिवस भरत आल्याचे संकेत असून, कायदेशीर प्रक्रियेतील सर्वोच्च
नवी दिल्ली : मुंबईत मार्च १९९३मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेमागील मुख्य सूत्रधार याकूब अब्दुल रझाक मेमन याचे दिवस भरत आल्याचे संकेत असून, कायदेशीर प्रक्रियेतील सर्वोच्च न्यायालयातील एक शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यावर कदाचित येत्या ३० जुलै रोजी त्याला फासावर लटकविले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर एप्रिलमध्ये राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. गळ्याभोवती आवळला जाणारा फास टाळण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतील शेवटचा प्रयत्न म्हणून याकूबने सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटिव्ह पीटिशन’ केला आहे. त्यावर येत्या २१ जुलै रोजी सुनावणी व्हायची आहे. ही याचिका फेटाळली गेली की याकूबला फासावर लटकविण्याचा मार्ग मोकळा होईल.
याकूब मेमन सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. तेथे फाशी देण्याची सोय आहे. सूत्रांनुसार याकूबच्या फाशीची तयारी ठेवण्याची सूचना नागपूर कारागृह प्रशासनास देण्यात आली आहे. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात काय होते यावर याकूबच्या फाशीचा नक्की दिवस ठरेल, असे कारागृहातील सूत्रांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्याचे महाराष्ट्र सरकार पालन करील. योग्य वेळी याविषयी अधिक माहिती दिली जाईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र