यामिनी जाधव, प्रताप सरनाईकांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर; शिंदे गटाची यादी जवळपास निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:16 PM2022-08-08T20:16:23+5:302022-08-08T20:26:59+5:30
Maharashtra Cabinet Expansion : काही आमदारांची पहिल्यांदाच मंत्रीपदी वर्णी लागणार असून यामिनी जाधव, प्रताप सरनाईकांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे.
मुंबई : उद्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. याबाबत जनसंपर्क कार्यालयाने पत्रक जारी केले आहे. यात 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाने आपल्या सर्व जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. यातच काही आमदारांची पहिल्यांदाच मंत्रीपदी वर्णी लागणार असून यामिनी जाधव, प्रताप सरनाईकांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे.
मंत्रिपदासाठी शिंदे गटाची यादी जवळपास निश्चित झाली आहे. यामध्ये यामिनी जाधव, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर, श्रीनिवास वनगा, दादा भुसे, गुलाबराव पाटील, सुहास कांदे, शंभुराजे देसाई, अनिल बाबर, प्रकाश अबिटकर, महेश शिंदे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदिपन भुमरे, भरत गोगावले, उदय सामंत, दीपक केसरकर, संजय राठोड, संजय रायमुलकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याचबरोबर, शिंदे-फडणवीस सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही अपक्ष पक्षच नेतेही मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यात आमदार बच्चू कडू, आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर आणि गीता जैन यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपाकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांची नावे निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहेत. तसेच, यामध्ये काही नवीन चेहऱ्यांना देखील भाजप संधी देऊ शकते.
दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 38 दिवस झाले तरी राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यामुळे विरोधी पक्षांतर्फे अनेकदा राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, या विस्ताराला काही केल्या मुहूर्त मिळत नव्हता. मात्र, विरोधकांसह सामान्य नागरिकांची प्रतीक्षा संपली असून, उद्या नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार असून, गृह आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.