यशवंत माने यांच्या बदलीला आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2017 12:33 AM2017-03-01T00:33:12+5:302017-03-01T00:33:12+5:30
निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांची राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या ‘ओएसडी’पदी बदली झाली
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांची राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या ‘ओएसडी’पदी बदली झाली आहे. प्रशासकीय कार्यवाहीनुसार त्यांना आज कार्यमुक्त करण्यात आले. परंतु, निवडणूक प्रक्रियेतील ‘ईव्हीएम’विषयी आरोप असल्याने बदलीवर विरोधकांनी आपेक्ष घेतला आहे.
राज्य शासनाच्या उपजिल्हाधिकारी संवर्गातून माने हे महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून प्रतिनियुक्तीवर २० सप्टेंबर २०१३ला रुजू झाले होते. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाचे सहायक आयुक्त म्हणून त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला.
कार्यतत्परता, कामाची तडफ आणि विशिष्ट कार्यशैलीमुळे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, राजीव जाधव आणि दिनेश
वाघमारे यांनी त्यांच्याकडे महत्त्वाचे पदभार सोपविले होते. त्यांच्याकडे एलबीटीबरोबरच निवडणूक विभाग, आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविला. भूमी-जिंदगी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
आतापर्यंत दोनवेळा मुदतवाढ तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने त्यांची नांदेड येथे बदली केली. मात्र, मंदीच्या काळातही एलबीटीचे उत्पन्न वाढविल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना वर्षभर मुदतवाढ देण्याचा ठराव पारित केला. त्यामुळे गेली वर्ष - दीड वर्ष ते महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून पुन्हा कार्यरत राहिले. जून महिन्यात त्यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष कार्य अधिकारीपदी नियुक्ती केली. तथापि, महापालिका निवडणूक असल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याकामी आयुक्त वाघमारे यांनी नकार दर्शविला. अखेरीस निवडणूक प्रक्रियेतील अटींना अधीन राहून सोमवारी त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)
>निवडणूक प्रक्रियेपूर्वी कार्यमुक्ती नको
पिंपरी : महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर महापालिकेतील दोन सहायक आयुक्तांच्या जबाबदारीमध्ये आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अचानक बदल केले. महापालिका निवडणुकीबाबत अनेक तक्रारी असताना निवडणूक प्रमुख व सहायक आयुक्त यशवंत माने यांची बदली केली आहे. तक्रारींचे निराकरण होईपर्यंत बदली करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी आयुक्तांनी सहायक आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांत बदल केला होता. माने यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याकडील विभागांचा कार्यभार अन्य सहायक आयुक्तांकडे सोपविला आहे. सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे मध्यवर्ती भांडार, नागरवस्ती व विकास, निवडणूक, तर सहायक आयुक्त चंद्रकांत खोसे यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालय, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माने यांच्या बदलीनंतर सहायक आयुक्त महेश डोईफोडे यांच्याकडे प्रशासन, माहिती व जनसंपर्क, एलबीटी विभागाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, महापालिका निवडणुकीची प्रक्रिया व आक्षेप निवारण होईपर्यंत माने यांच्या बदलीला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. महापालिका निवडणुकीचे संपूर्ण कामकाज अद्याप पूर्ण झालेले नाही. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये अजून सुरू आहेत. उमेदवारांच्या तक्रारी येत आहेत. ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. प्रभागरचनेपासून ते निवडणूक निकालापर्यंत भाजपने प्रशासनाचा गैरवापर करून निवडणूक जिंकल्या आहेत. तसेच पैसा, गुन्हेगार, पोलीस यंत्रणा यांना हाताशी धरून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर माने यांच्या बदलीने निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे ढग आहे. निवडणुकीत भाजपाला मदत केल्याची त्यांना बक्षिसी मिळाली आहे. उमेदवारांच्या तक्रारींचे निराकरण झाले नसल्याने निवडणूक कामकाज पूर्ण होईपर्यंत माने यांची बदली रद्द करावी अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व सभागृहनेत्या मंगला कदम यांनी दिला आहे.