शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी यशवंत सिन्हांचे प्रयत्न; उद्धव ठाकरेंशी बोलणी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 08:15 AM2022-07-08T08:15:11+5:302022-07-08T08:15:36+5:30
विरोधकांच्या संयुक्त उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा कायम राहावा, यासाठी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा प्रयत्न करीत आहेत. यासाठी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती करणार आहेत.
विरोधकांच्या संयुक्त उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जूनला दिल्लीत आयोजित केलेल्या बैठकीला शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर स्थिती बदलली आहे. शिवसेनेचे विधानसभेत ५५ सदस्य आहेत. त्यापैकी ४० जण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळे झाले आहेत. यामुळे या आमदारांची मते यशवंत सिन्हा यांना मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
लोकसभेत शिवसेनेचे १९ खासदार व राज्यसभेत ३ खासदार आहेत. या २२ खासदारांचे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एकूण मूल्य १५ हजार ४०० एवढे आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचे मूल्य १७५ एवढे निश्चित केले आहे. यामुळे शिवसेनेकडे असलेल्या एकूण ५५ आमदारांचे मूल्य ९,६२५ एवढे आहे. शिवसेनेच्या बंडखोर ४० आमदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्यास शिवसेनेकडून सिन्हा यांना १५ आमदारांकडून केवळ २,६२५ मूल्यांची मते मिळू शकतील.