यशवंतरावांचे वक्तव्य पुस्तकात लिहिले
By Admin | Published: February 9, 2017 05:17 AM2017-02-09T05:17:26+5:302017-02-09T05:17:26+5:30
टॅक्सेशन एन्क्वायरी कमिटीच्या रिपोर्टवरील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिक्रियेबद्दलचे वक्तव्य यशवंतराव चव्हाण यांनी माझ्याजवळ केले होते.
पुणे : टॅक्सेशन एन्क्वायरी कमिटीच्या रिपोर्टवरील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिक्रियेबद्दलचे वक्तव्य यशवंतराव चव्हाण यांनी माझ्याजवळ केले होते. माझ्या पुस्तकात तोच प्रसंग मी लिहिला असून, गांधी यांच्याशी झालेल्या गोपनीय चर्चेच्या वेळी मी उपस्थित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
‘अनफिनिश्ड इनिंग्ज’ या गोडेबोले लिखित १९९६ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील चर्चेच्या दरम्यान केला. त्यावर काँग्रेसच्या एका
खासदाराने गोडबोले गोपनीय चर्चेच्या वेळी कसे उपस्थित असू
शकतात, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
यशवंतराव चव्हाण केंद्रीय गृहमंत्री आणि वित्तमंत्री
असताना गोडबोले त्यांचे खासगी सचिव होते.
गोडबोले म्हणाले, की मोठ्या नोटांचे डिमॉनिटायझेशन केले पाहिजे, अशी शिफारस टॅक्सेशन एन्क्वायरी कमिटीने केली होती. न्यायमूर्ती वांच्छू यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल मांडण्यासाठी अर्थमंत्री, रिझर्व्ह बँक, आणि वित्त विभागाची बैठक झाली.
हा विषय संवेदनशील असल्याने चव्हाण यांनी गांधी यांची भेट घेतली, व समितीची शिफारस त्यांना कथन केली. त्यावर गांधी यांनी या विषयाची अंमलबजावणी केल्यावर काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे की नाही? अशी प्रतिक्रिया दिली होती. आपण चव्हाण यांचे सचिव असल्याने त्यांनी ही बाब आपल्याला सांगितली होती. (प्रतिनिधी)