यवतमाळमध्ये फवारणीचे १८ बळी, ‘त्या’ शेतक-यांच्या मृत्यूची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:01 AM2017-10-04T06:01:05+5:302017-10-04T06:01:30+5:30
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे तीन महिन्यांत १८ शेतक-यांचा बळी गेला, तर ५४६ शेतकरी अत्यवस्थ झाले आहेत.
मुंबई : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे तीन महिन्यांत १८ शेतक-यांचा बळी गेला, तर ५४६ शेतकरी अत्यवस्थ झाले आहेत. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने या प्रकरणाची अतिरिक्त मुख्य गृह सचिवांकडून चौकशी करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.
पीडित कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाखांची मदत सरकारने जाहीर केली. अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘सेफ्टी किट’ वितरित करण्याचे बंधन कीटकनाशक कंपन्यांवर घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. विमा योजनेसाठी अपात्र किंवा तांत्रिक कारणाने विमा कंपन्यांकडून मदत मिळू न शकणा-या शेतक-यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. फवारणीबाबत कृषी विभागातर्फे जनजागरण मोहीम हाती घेण्यात येईल.
विषबाधा प्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाला आहे. फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे शेतक-यांना जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालणार आहे.
- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री