‘त्या’ भाषणातील मंडी टोळी यवतमाळची! भाजपा कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:42 AM2018-03-25T00:42:24+5:302018-03-25T00:42:24+5:30
एका मंत्र्याच्या शहरात ‘मंडी टोळी’ नावाची एक कुख्यात टोळी असून या टोळीकडे किमान ४ हजार शस्त्रे आहेत. जागा-घरे रिकामी करणे, खंडणी वसुलीे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग ही टोळी करीत असल्याचा जो आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत अलीकडेच केला तो यवतमाळबाबत होता अशी चर्चा आता सुरू आहे.
मुंबई : एका मंत्र्याच्या शहरात ‘मंडी टोळी’ नावाची एक कुख्यात टोळी असून या टोळीकडे किमान ४ हजार शस्त्रे आहेत. जागा-घरे रिकामी करणे, खंडणी वसुलीे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग ही टोळी करीत असल्याचा जो आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत अलीकडेच केला तो यवतमाळबाबत होता अशी चर्चा आता सुरू आहे.
विखे पाटील यांनी २२ मार्च रोजी विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर बोलताना श्याम जयस्वाल आणि बंटी जयस्वाल यांच्या मंडी टोळीचा संदर्भ दिला होता. यवतमाळ शहरात या दोन व्यक्तींकडून चालविली जाणारी टोळी सक्रिय असल्याचे म्हटले जाते. याबाबत संपर्क साधल्यावर
विखे म्हणाले की, मंत्री आणि जयस्वाल टोळीचा संबंध उघड करणारी पुरेशी कागदपत्रे माझ्याकडे आलेली आहेत. मी त्याबाबत आणखी गौप्यस्फोट करेन. मुख्यमंत्र्यांनी सदर राज्यमंत्री आणि श्याम व बंटी जयस्वालमधील संवादाचा कॉल रेकॉर्ड तपासावा म्हणजे त्यांना धक्कादायक वास्तव कळेल. मी सभागृहात मंत्री वा जिल्ह्याचे नाव घेतले नाही पण त्याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: चौकशी करून ही नावे समोर आणण्याचे धाडस दाखवावे.
पालकमंत्र्यांचा मंडी टोळीशी संबंध नाही
यवतमाळ - विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा मंत्र्यांचे कुख्यात ‘मंडी टोळी’ला समर्थन असल्याचा आरोप केला. हे आरोप केवळ राजकीय द्वेषातून केले असून याची कायदेशीर चौकशी व्हावी, पालकमंत्री मदन येरावार यांचा मंडी टोळीशी कुठलाही संबंध नसल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.