यवतमाळमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा, भाजपा सरकारचा निषेध, पारंपरिक वाद्यांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:20 AM2017-10-17T04:20:35+5:302017-10-17T04:20:59+5:30
कर्जमाफी, फवारणीमुळे शेतक-यांचे होणारे मृत्यू, महागाई, जीएसटीची अंमलबजावणी अशा मुद्द्यांवर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने यवतमाळात सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यवतमाळ : कर्जमाफी, फवारणीमुळे शेतक-यांचे होणारे मृत्यू, महागाई, जीएसटीची अंमलबजावणी अशा मुद्द्यांवर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने यवतमाळात सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
पारंपरिक डफ, सनई यांच्या ताला-सुरांनी सरकारविरोधात काढलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला. या मोर्चात दहा-पंधरा बैलगाड्याही होत्या. एका बैलगाडीत बसलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, वजाहत मिर्झा घोषणा देत होते. मोर्चाच्या पुढे चालत शिवाजीराव मोघे कार्यकर्त्यांना सूचना करीत होते. भजनी मंडळाने ग्रामीण माणसाच्या मनातील व्यथा भजनांतून व्यक्त केली. भाजपा सरकारने अर्धवट ठेवलेले किंवा आश्वासन देऊनही पूर्ण न केलेले मुद्दे मोर्चेक-यांच्या हातातील फलक बनले होते.
कर्जमाफी भिकेसारखी देऊ नका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काशी बनारस मतदारसंघातील दवाखान्यात लोक मरत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या गोरखपूरमध्ये तर दोनशे मुले दगावली. विदर्भात वाघाच्या हल्ल्यात लोक मरत आहेत. पण सरकार याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. हे शासन नरभक्षक आहे. शेतक-यांची कर्जमाफी ही भीक नव्हे. मात्र शासन भीक दिल्यासारखीच कर्जमाफीची प्रक्रिया राबवित आहे. पूर्वी मोदी किटली घेऊन चहा विकायचे. पण आता ते जेटली घेऊन देश विकायला बसले आहेत, असा घणाघात मोहन प्रकाश यांनी जाहीर सभेत केला.
चाय-गाय करणा-यांना बाय-बाय करा - अशोक चव्हाण
कर्जमाफीच्या अर्जातही भाजपा सरकार शेतकºयांची जात लिहून घेत आहे. मागासवर्गीय, मुस्लिमांवर हल्ले वाढले आहेत. मराठा, धनगर आरक्षण बाजूला टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस नसून ते फसणवीस आहेत. पण आता वारं बदललं आहे.
म्हणूनच नांदेडमध्ये भाजपाचा सुपडासाफ झाला. मोदी चाय चाय म्हणतात. योगी गाय गाय करतात. आता जनतेने यांना बाय बाय म्हणण्याची वेळ आली आहे, असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.