यवतमाळच्या शेतकऱ्यांचे मुंबईत अर्धनग्न आंदोलन
By Admin | Published: July 23, 2014 12:59 AM2014-07-23T00:59:15+5:302014-07-23T00:59:15+5:30
जुनी व नवीन कर्जे पुनर्गठीत करण्याची मागणी करत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदानात अर्धनग्न आंदोलन केले. शिवाय मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा
मुंबई : जुनी व नवीन कर्जे पुनर्गठीत करण्याची मागणी करत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदानात अर्धनग्न आंदोलन केले. शिवाय मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आम आदमी पार्टी शेतकरी आघाडीने घेतला आहे.
जुलैच्या मध्यापर्यंत पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना तीनवेळा पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना त्यांची जुनी व नवी कर्जे पुनर्गठीत करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. मार्च महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. मात्र शासन त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप संघटनेचे जिल्हा सचिव जितेश राठोड यांनी केला. शिवाय तीन वर्षांसाठी कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासनही सरकारने दिले होते. त्याचे पालन सरकारने करावे, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.
दीड महिने पावसाने दडी मारल्याने यवतमाळ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. शिवाय जुन्या कर्जावरील व्याज माफ करून नवीन बिनव्याजी कर्ज मंजुरी देण्याची गरज आहे. शिवाय ज्या बँका शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी राठोड यांनी केली आहे.