नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान यवतमाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:01 AM2018-08-09T05:01:25+5:302018-08-09T05:01:39+5:30
रॅली फॉर रिव्हरअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
मुंबई : रॅली फॉर रिव्हरअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. या वेळी वाघारी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मंजुरी दिली.
ईशा फाऊंडेशनच्या वतीने नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी रॅली फॉर रिव्हर हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण या वेळी राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव आदी या वेळी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, वाघारी नदीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनही होणार आहे. त्यामुळे हा फक्त एका जिल्ह्यासाठी नसून संपूर्ण देशासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. मुनगंटीवार म्हणाले, पर्यावरण संवर्धनाबरोबर शेतकºयांच्या उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प आवश्यक असून सध्याच्या योजनांमधून निधी पुरवठा करता येईल.