काश्मिरातील अतिरेकी हल्ल्यात यवतमाळचा जवान शहीद
By Admin | Published: September 19, 2016 07:53 PM2016-09-19T19:53:04+5:302016-09-19T19:53:04+5:30
जम्मू काश्मिरातील उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर शनिवारी पहाटे अतिरेक्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पुरड गावचा जवान शहीद झाला
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. १९ : जम्मू काश्मिरातील उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर शनिवारी पहाटे अतिरेक्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पुरड गावचा जवान शहीद झाला. विकास जनार्दन कुडमेथे असे या वीरपुत्राचे नाव आहे. दरम्यान मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर पुरड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
वणी तालुक्यातील पुरड या गावातील विकास कुडमेथे हे २००८ मध्ये लष्करात भरती झाले होते. देशसेवेच्या भावनेने त्यांनी लहानवयापासूनच सैन्यात जाण्याचे ध्येय बाळगले होते. घरच्या गरिबीवर मात करीत त्यांनी शरीर कमावले. ग्रामीण भागातील हा तरुण डोग्रा बटालियनमध्ये ह्यसिलेक्टह्ण झाला होता.
दरम्यान, शनिवारी विकास कुडमेथे ज्या उरी येथील तळावर तैनात होते, तेथे अतिरेक्यांनी सशस्त्र हल्ला चढविला. पहाटेच्या सुमारास अचानक हल्ला झाल्याने सुरुवातीला भारतीय सैन्य बेसावध होते. मात्र, क्षणातच त्यांनी आघाडी सांभाळली आणि जवळपास तीन तास अतिरेक्यांना दमदार प्रत्युत्तर दिले. या धुमश्चक्रीत चारही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले. मात्र, १८ भारतीय जवानही शहीद झाले. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुरड येथील विकास कुडमेथे यांचाही समावेश होता.
ही वार्ता सोमवारी सकाळी पुरड गावात धडकताच शोकाकूल वातावरण निर्माण झाले. विकास यांची पत्नी स्नेहा, आई विमल, वडील जनार्दन या कुटुंबीयांवर तर दु:खाचा डोंगरच कोसळला. त्यांचा आक्रोश अख्ख्या गावाचे मन हेलावून टाकत होता. विकास यांची अवघी दहा महिन्यांची मुलगी जिज्ञासा ही सध्या आजारी आहे. रडणाऱ्या आईच्या कडेवर बसलेल्या जिज्ञासाचा केविलवाणा चेहरा साऱ्यांचे काळीज कुरतडत होता. दरम्यान, विकास यांचे पार्थिव सोमवारी रात्रीपर्यंत नागपुरात येणार असून मंगळवारी पुरड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. आपल्या गावातील वीरपुत्राचा अभिमान बाळगणारे पुरड येथील शोकाकूल गावकरी संपूर्ण दिवसभर कुडमेथे यांच्या घरापुढे बसून होते.