यवतमाळमध्ये कामगार नेते अशोक देठे यांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2018 10:31 AM2018-04-01T10:31:13+5:302018-04-01T10:31:13+5:30
वणी तालुक्यातील कुंभारखनी वेकोली वसाहतीत जुन्या वैमनस्यातून कामगार नेता अशोक चारूदत्त देठे (45) याची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मृताची पत्नी गंभीर जखमी झाली.
यवतमाळ : वेकोलीच्या कामगार संघटनेच्या निवडणुकीवरून झालेल्या वादात एका कामगार नेत्याची गुप्तीने वार करून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील कुंभारखणी कोळसा खाणीच्या कामगार वसाहतीत घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अशोक चारूदत्त देठे (४५) असे मृत कामगार नेत्याचे नाव आहे. याप्रकरणात उमेश किशोरचंद्र रॉय (२७), लक्ष्मीकांत रॉय (२५) व सूरज सागर (२५) या तिघांना शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आठ दिवसांपूर्वी कुंभारखणी येथील वेकोलि कामगार संघटनेची निवडणूक पार पडली. अटीतटीच्या या निवडणुकीत अशोक देठे अध्यक्षपदी निवडून आले. तेथूनच वादाची ठिणगी पडली. निवडणुकीत निवडून आल्यानंतर अशोक देठे हे विरोधकांना जाणुनबुजून टोमणे हानत होते, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले. शनिवारी कुंभारखणी येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातदेखिल अशोक देठे यांनी विरोधकांना निवडणुकीवरून टोमणे हानले. त्यामुळे विरोधी गटाचे माथे सणकले. तेथेही शाब्दीक वादावादी झाली. याच मुद्यावरून शनिवारी रात्री पुन्हा अशोक देठे व रॉय गटात वाद झाला. यावेळी अशोक देठे आरोपींच्या घरासमोर उभे असताना विरोधी गटातील उमेश रॉय, लक्ष्मीकांत रॉय व सूरज सागर या तिघांनी अशोक देठे यांच्यावर गुप्तीने हल्ला चढविला. या तिघांपैकी एकाने लोखंडी रॉडने देठे यांच्या डोक्यावर वार केला, तर अन्य एकाने देठे यांच्या शरिरावर गुप्तीने सपासप वार केले. त्यामुळे अशोक देठे रक्ताच्या थारोळ्यात कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडेमोडे, डी.बी.पथकातील सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी देठेचा मृतदेह ताब्यात घेऊन वणीच्या ग्रामीण रूग्णालयात आणला. त्यानंतर पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. रविवारी दुपारपर्यंत पोलिसांकडून आरोपींची विचारपूस केली जात होती.
मृताच्या पत्नीला धक्का
अशोक देठे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर त्यांची पत्नी भावना देठे यांना चांगलाच मानसिक धक्का बसला. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांनाही वणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.