यवतमाळ ‘मेडिकल’च्या डॉक्टरविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा
By admin | Published: June 9, 2016 05:54 AM2016-06-09T05:54:04+5:302016-06-09T05:54:04+5:30
विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छेड काढल्यावरून मंगळवारी विद्यार्थिनींनी बेदम चोप देत त्याची अधिष्ठात्यांच्या कक्षापर्यंत वरात काढली होती.
शरद महादेव मनोरे (२८) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. तो येथील मनोविकृतीशास्त्र विभागात प्रभारी विभाग प्रमुख आहे. त्याने शिबिरादरम्यान एका विद्यार्थिनीची छेड काढली होती. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र मंगळवारी डॉ. मनोरे स्त्रीरोग विभागाच्या वॉर्डकडे आला असताना संबंधित विद्यार्थिनीने मैत्रिणीच्या मदतीने त्याला पकडून चोप दिला. बेदम मारहाण करीत त्याला अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्या कक्षात नेण्यात आले.
बुधवारी या विद्यार्थिनीने याची तक्रार यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून डॉ. मनोरे याच्याविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर आपणास मारहाण झाल्याची तक्रार मनोरे यानेही दिली. त्यावरून प्रशिक्षणार्थी डॉ. श्रीकांत पिंगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)