यवतमाळ पोलिसांचा शिष्यवृत्ती पॅटर्न राज्यभरात
By admin | Published: October 31, 2016 04:51 AM2016-10-31T04:51:51+5:302016-10-31T04:51:51+5:30
कर्मचारी कल्याण निधीतून पोलिसांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून देणारा यवतमाळ जिल्हा पोलिसांचा शिष्यवृत्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला
यवतमाळ : कर्मचारी कल्याण निधीतून पोलिसांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून देणारा यवतमाळ जिल्हा पोलिसांचा शिष्यवृत्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. महासंचालकांनी सर्व ग्रामीण
पोलीस दल आणि पोलीस आयुक्तालयांसाठी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी सोडविण्याकरिता यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पुढाकार घेतला. त्यांनी जिल्ह्यात पोलिसांच्या पाल्यांकरिता शिष्यवृत्ती योजना लागू केली. त्यानुसार २५ हजार रुपये अनुदान आणि ५० हजार रुपये शैक्षणिक कर्ज कर्मचारी कल्याण निधीमधून दिले जाते. २५ हजारांची परतफेड करावी लागत नाही. परंतु ५० हजारांच्या शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीसाठी १२ हप्ते पाडून दिले जातात. या शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज योजनेसाठी कर्मचारी कल्याण निधीमध्ये प्रत्येकी दहा लाख या प्रमाणे २० लाखांच्या रकमेचे आरक्षण करण्यात आले आहे.
यवतमाळ पोलिसांच्या या शिष्यवृत्ती पॅटर्नचा पोलीस महासंचालक कार्यालयाने सुमारे महिनाभर अभ्यास केला. त्यानंतर हा पॅटर्न स्वीकारून संपूर्ण राज्यासाठी तो लागू करण्यात आला आहे.
पोलीस कल्याण निधीसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून विशिष्ट रक्कम कपात केली जाते. याशिवाय ‘वेल्फेअर शो’च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही रक्कम या खात्यात जमा होते. अनेक ठिकाणी या वेल्फेअर फंडाचे वेगवेगळे स्रोत असतात. त्यातून मोठी रक्कम गोळा होते. आता या उपक्रमामुळे हा निधी मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाईल. (प्रतिनिधी)