यवतमाळ जिल्हा परिषदेतील भरती परीक्षा रद्द
By admin | Published: November 5, 2014 04:12 AM2014-11-05T04:12:31+5:302014-11-05T04:12:31+5:30
लेखी परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली.
यवतमाळ : जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी (कृषी), कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तारतंत्री या पदांसाठी घेण्यात आलेली लेखी परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली.
महिवाल म्हणाले, यवतमाळ जिल्हा परिषदेतील चार संवर्गासाठी २ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर आपण स्वत: तयार केला. हा पेपर औरंगाबाद येथे फुटल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता फॅक्सद्वारे दिली. याच प्रकरणात मंगळवारी औरंगाबादचे पोलीस पथक यवतमाळमध्ये आले. त्यांनी आरोपींकडून जप्त केलेल्या उत्तरपत्रिकेची माहिती दिली. यासंदर्भात लेखी जबाबही घेतले.
पोलिसांनी दिलेल्या उत्तरपत्रिकेशी विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता आणि तारतंत्री यांच्या उत्तरपत्रिका मिळत्या जुळत्या असल्याचे आढळून आले आहे. मात्र, पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेली मूळ उत्तरपत्रिका दिलेली नाही. त्याची प्रत द्यावी, अशी लेखी मागणी आपण दुसऱ्यांदा करणार आहोत, असे महिवाल म्हणाले़ जिल्हा निवड समितीचा पेपर फुटल्याचे दिसून येते. या चारही संवर्गातील परीक्षा रद्द करून त्या संदर्भात चौकशी समिती स्थापन करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल. (प्रतिनिधी)