यवतमाळच्या डॉक्टरची रिओ आॅलिम्पिकसाठी निवड
By admin | Published: July 26, 2016 12:51 AM2016-07-26T00:51:46+5:302016-07-26T00:51:46+5:30
ब्राझील येथे होणाऱ्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी यवतमाळमधील डॉ. राकेश चकुले यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने निवड केली आहे.
- नीलेश भगत, यवतमाळ
ब्राझील येथे होणाऱ्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी यवतमाळमधील डॉ. राकेश चकुले यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने निवड केली आहे. विशेष म्हणजे देशातील केवळ दोन डॉक्टरांना हा मान मिळाला आहे.
या वेळच्या आॅलिम्पिक स्पर्धेला रिओ (ब्राझील) येथे आॅगस्ट महिन्यापासून सुरुवात होत आहे. खेळाडूंना होणाऱ्या ‘स्पोर्ट इन्ज्युअरी’च्या उपचारासाठी इंडियन आॅलिम्पिक कमिटीने (आयओसी) भारतातील दोन डॉक्टरांची निवड केली आहे. त्यात यवतमाळ येथील डॉ. राकेश शंकर चकुले व जयपूर येथील डॉ. रजत जांगीड यांचा समावेश आहे.
यवतमाळच्या शिवनेरी सोसायटीतील रहिवासी व सध्या नवी मुंबई येथे प्रॅक्टिस करणारे डॉ. राकेश चकुले आॅर्थोपेडिक सर्जन म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वत: फुटबॉलमध्ये राज्यस्तर व अॅथलेटिक्समध्ये विद्यापीठ स्तरावर त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केले आहे. मुंबईच्या नानावटी हॉस्पिटल येथून डी. आॅर्थो उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी रशिया येथून आॅर्थोपेडिकमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. डॉ. चकुले यांनी स्पोर्ट्स मेडिसिन व इन्ज्युअरीमध्ये कौशल्य प्राप्त करण्यासाठी जर्मनी, स्वित्झरलँड, फ्रान्स, आॅस्ट्रिया, फिनलंड व रशिया या देशात कार्यशाळा केल्या आहेत.
आॅलिम्पिक कमिटीने केली उपेक्षा
- २०१३ मध्ये आयओसीने जगभरातील डॉक्टरांसाठी स्पोटर््स मेडिसिनचा डिप्लोमा सुरू केला. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खूप खर्च येणार होता. इंडियन आॅलिम्पिक कमिटीने विद्यार्थ्यांची शिफारस केल्यास त्यांना आयओसीतर्फे शिष्यवृत्ती मिळणार होती. मी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला व केवळ शिफारसपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र आॅलिम्पिक कमिटी व इंडियन आॅलिम्पिक कमिटीकडे खूप प्रयत्न केले.
मात्र मला शिफारसपत्र मिळाले नाही. तरीही उमेद न हारता मी जिद्दीने स्वखर्चाने हा अभ्यासक्रम पूर्ण केला. आज याच अभ्यासक्रमाच्या बळावर मला आॅलिम्पिकला जाण्याची संधी मिळाली आहे, असे डॉ. राकेश चुकले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.