यवतमाळच्या हायटेक उच्चभ्रू चोरांना वर्धेत अटक
By admin | Published: August 4, 2014 12:48 AM2014-08-04T00:48:47+5:302014-08-04T00:48:47+5:30
महागडा पोशाख व महागड्या गाडीचा वापर करून घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला वर्धा पोलिसांनी जेरबंद केली आहे. तीन जणांचा समावेश असलेली ही टोळी यवतमाळ येथील असून
तिघांना अटक : सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा : महागडा पोशाख व महागड्या गाडीचा वापर करून घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला वर्धा पोलिसांनी जेरबंद केली आहे. तीन जणांचा समावेश असलेली ही टोळी यवतमाळ येथील असून त्यांच्याकडून ५ लाख २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे रोशन मोतीलाल क्षीरसागर (२१), पवन रवी पाईकराव (१९), सागर विजयराव राऊत (२१) तिन्ही रा. यवतमाळ अशी आहेत. अटक करण्यात आलेले तिघेही उच्चभ्रू परिवारातील असून ते महागड्या गाडीने येऊन दोन ते तीन दिवस पाळत ठेवून चोरी करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारातून त्यांनी विविध जिल्ह्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
शहरात सुरू असलेल्या घरफोड्यांच्या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली; मात्र शहरातील काही मोठ्या चोऱ्यांचा सुगावा लागत नव्हता. या मोठ्या चोऱ्या उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या चोऱ्यांचा शोध घेत असताना वर्धेतील बाळकृष्णनगर येथील अमर व्यंकटराव हिंगे यांच्याकडे घरफोडी झाली. हिंगे हे परिवारासह रोज सायंकाळी काही कालावधीकरिता घराला कुलूप लावून मंदिरात जात. याच वेळात चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना घटनेनंतर काही तासांनी यवतमाळ मार्गावरील एका धाब्यावर तीन इसम जेवणाकरिता थांबल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर वर्धा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या चमूने यवतमाळच्या दिशेने तपास सुरू केला. दरम्यान, यवतमाळ येथील वर्धा पोलिसांच्या खबऱ्याकडून एक अट्टल गुन्हेगारांची टोळी सध्या मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी यवतमाळ येथे सापळा रचून या चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांना विचारपूस केली असता प्रारंभी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ताब्यात घेतलेल्या युवकांच्या घरांची झडती घेतली असता तेथे चोरीतील मुद्देमाल मिळून आला. तरीसुद्धा हे युवक गुन्हा केल्याचे नाकारत होते. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनील पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.पी. बुराडे, सहायक पोलीस निरीक्षक बाबरे, ज्ञानेश्वर निशाने, जमादार गजानन लामसे, गजानन गहूकर, आकाश चुंगडे, धर्मेद्र अकाली, सचिन खैरकार, विशाल बंगाले यांनी केली. (प्रतिनिधी)