यंदा वह्या, पुस्तके वेळेत

By admin | Published: April 19, 2016 02:07 AM2016-04-19T02:07:51+5:302016-04-19T02:07:51+5:30

मागील वर्षी शैक्षणिक वर्ष संपायला आले असताना विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडले होते. दरवर्षी विद्यार्थ्यांना हाच अनुभव येत असल्याने त्याचे खापर पालिकेच्या माथी फोडले जात होते

This year, books are in time | यंदा वह्या, पुस्तके वेळेत

यंदा वह्या, पुस्तके वेळेत

Next

ठाणे : मागील वर्षी शैक्षणिक वर्ष संपायला आले असताना विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडले होते. दरवर्षी विद्यार्थ्यांना हाच अनुभव येत असल्याने त्याचे खापर पालिकेच्या माथी फोडले जात होते. परंतु, यंदा मात्र ते वेळेत विद्यार्थ्यांच्या हाती पडेल, असा विश्वास आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील वर्षी व्यक्त केला होता. त्यानुसार, यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडणार आहे. सलग दोन वर्षांचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आता येत्या मंगळवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिक्षण समितीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी लावलेला विलंब आणि महासभेच्या सावळ्या गोंधळामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीची प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे वर्षाच्या सुरु वातीला मिळणारे साहित्य वर्ष संपायला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना देण्यास सुरुवात झाली होती. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी २०१४-१५च्या आर्थिक वर्षात २० कोटी १३ लाखांची आर्थिक तरतूद शिक्षण मंडळाने केली होती. त्यानंतर, हे मंडळ बरखास्त होऊन शिक्षण समितीची निर्मिती झाली. ठाणे पालिकेत सत्तेसाठी चालू असलेल्या सत्ता संघर्षामुळे शिक्षण समिती स्थापन करण्यास सप्टेंबर २०१५ उजाडले. नव्याने निर्माण झालेल्या शिक्षण समितीमुळे पूर्वीची साहित्यवाटपाची आॅर्डर रद्द करावी लागली होती आणि नव्याने ठेकेदार निवडण्याची प्रक्रि या करावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती उशिराने शैक्षणिक साहित्य पडले होते.
हा पूर्वानुभव पाहता यंदा पालिकेने विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच सलग दोन वर्षांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. महापालिकेच्या १२६ प्राथमिक शाळा असून त्यामध्ये सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना आता शैक्षणिक वर्ष सुरू होताच साहित्य मिळणार आहे. यामध्ये गणवेश, दप्तर, स्वेटर, रेनकोट, वॉटरबॅग व लंचबॉक्स, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, शाळा व कार्यालयीन साहित्य छपाई, शूज व मोजे आदी साहित्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: This year, books are in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.