यंदा हज यात्रेसाठी कमिटीच्या कोट्यात २५ हजारांनी वाढ
By admin | Published: March 20, 2017 03:44 AM2017-03-20T03:44:35+5:302017-03-20T03:44:35+5:30
हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने हज यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. या समितीचा कोटा तब्बल २५ हजारांनी वाढविण्यात आला
जमीर काझी / मुंबई
हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने हज यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. या समितीचा कोटा तब्बल २५ हजारांनी वाढविण्यात आला असून, यंदा सव्वा लाख यात्रेकरूंना पाठविण्यात येणार आहे. हज कमिटीच्या समितीने सौदी सरकारबरोबर या यात्रेसंबंधी नुकताच तीन वर्षांचा करार केला आहे. त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, मदिना येथील धार्मिक विधीवेळी सर्वांना मस्जिद-ए-नवबी (मरकजिया) प्रत्येक यात्रेकरूची सातशे रियाल (सौदी रियाल)मध्ये निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांची होणारी पायपीट थांबणार आहे.
इस्लाम धर्मीयांमध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हज यात्रेचा मुख्यविधी यावर्षी ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबरमध्ये होत आहे. त्यासाठी देशभरातील पाच लाखांवर इच्छुकांकडून आॅनलाइन अर्ज आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
इस्लाममधील पाच प्रमुख तत्त्वांपैकी हज यात्रा ही एक महत्त्वाचे तत्त्व असून, हज कमिटी आॅफ इंडियातर्फे त्याबाबतची प्रकिया राबविली जाते. आतापर्यंत हा विभाग परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारित होता. या वर्षापासून मात्र, तो अल्पसंख्याक विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मदिना येथे बांधकाम सुरू असल्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून हज कमिटीचा कोटा कमी करून १ लाखांवर आणण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना जादा रक्कम मोजून खासगी टूर्स कंपनीच्या मार्फत जावे लागत होते. हज कमिटीचे अध्यक्ष चौधरी मेहबूब अली कैसर यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांच्या पथकाने सौदी अरेबियाला जात, हज यात्रेचे नियोजन करणाऱ्या संस्थेशी २०१७ ते २०२० या कालावधीकरिता करार केला. त्यानुसार, मक्केतील बहुतांश बांधकामे पूर्ण होत आल्याने, हज कमिटीसाठी पूर्ववत १ लाख २५ हजार यात्रेकरूंचा कोटा, तसेच प्रवासात(अरफात) एअर कुलर, आग प्रतिबंधत यंत्र आणि नाश्ता व भोजनाची व्यवस्था पुरविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सुरुवातीला प्रत्येक यात्रेकरूसाठी ४०० रियालचा प्रस्ताव होता. मात्र, चर्चेनंतर तो २०० रियाल इतका करण्यात आला. त्याचप्रमाणे, ‘मरकजिया’ येथील निवासासाठीचे ७५० ते १ हजार रियालचा दर ७०० रुपये इतका निश्चित करण्यात आला.
शिष्टमंडळाने सौदीतील भारतीय राजदूत व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जावेद अहमद, कौन्सल जनरल जेद्दाह नूर रहमान शेख, कौन्सल (हज) शाहीद आलम यांच्याशी चर्चा केली.