यंदा साईभक्तांचे १८ कोटींचे दान; ६ लाख भाविकांनी घेतले प्रसाद भोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:42 AM2019-01-03T01:42:24+5:302019-01-03T01:42:40+5:30
नाताळ व नववर्षाच्या दिवशी साडेनऊ लाख भाविकांनी साईबाबांच्या चरणी १८ कोटी १६ लाख रुपयांचे दान अर्पण केले. ही रक्कम गत वर्षीपेक्षा तीस लाख रुपयांनी कमी आहे.
शिर्डी : नाताळ व नववर्षाच्या दिवशी साडेनऊ लाख भाविकांनी साईबाबांच्या चरणी १८ कोटी १६ लाख रुपयांचे दान अर्पण केले. ही रक्कम गत वर्षीपेक्षा तीस लाख रुपयांनी कमी आहे़
दरवर्षी २२ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात देश-विदेशातून भाविक शिर्डीत येतात. आयुष्यभर फकीर राहिलेल्या साईबाबांच्या झोळीत भाविकांकडून लाखो रुपयांचे दान अर्पण केले जाते. यंदा मंदिर परिसरात ठेवलेल्या दानपेटीतून ८़५ कोटी, देणगी काउंटरद्वारे ३़३ कोटी, डेबिट, क्रेडिट कार्ड, आॅनलाइन देणगी, चेक, डीडी, मनीआॅर्डरद्वारे ३ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे़ देणगी स्वरूपात १४़२८ लाखांचे ५०७ ग्रॅम सोने व ४़८२ लाखांची साडेसोळा किलो चांदीचा यात समावेश आहे़ शिवाय १९ देशांचे परकीय चलनही मिळाले. त्याचे भारतीय मूल्य ३० लाख ६३ हजार रुपये आहे़ संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी बुधवारी या दानाची माहिती दिली़ सशुल्क पासेसच्या ३ कोटी ६२ लाख रुपयांसह देणगीचा आकडा १८ कोटी १६ लाखांवर गेला.
६ लाख भाविकांनी घेतले प्रसाद भोजन
या कालावधीत ६ लाख ७ हजार ४८४ भाविकांनी प्रसाद भोजनाचा, तर सव्वा लाख भाविकांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला़ दर्शनरांगेत ९ लाख ४१ हजार बुंदी पाकिटांचे वाटप करण्यात आले़ भक्तनिवासांमध्ये १ लाख ८२ हजार भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली, तर तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मंडपातही जवळपास २१ हजार भाविकांनी आसरा घेतला, असे कदम म्हणाले.