ऊसतोड मजूर टंचाईवर यंदा यंत्रतोड, खुद्द तोडीचा उतारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 02:25 AM2020-12-17T02:25:44+5:302020-12-17T02:26:03+5:30
पश्चिम महाराष्ट्रात सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे. ऊसही मुबलक आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा ऊस तोड मजुरांच्या टोळ्या आलेल्या नाहीत .
पश्चिम महाराष्ट्रात सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे. ऊसही मुबलक आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा ऊस तोड मजुरांच्या टोळ्या आलेल्या नाहीत . परिणामी यंदाचा हंगाम लांबणार आहे. ऊसतोडणी यंत्र आणि खुद्दतोड हे पर्याय अवलंबून ऊसतोड मजुरांच्या टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यंकडून सुरू आहे. याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे याचा हा आढावा.
कोल्हापूर- विभागात तब्बल २०% मजूर कमी
कोल्हापूर : सोलापूरसह मराठवाड्यात झालेला चांगला पाऊस, त्यात एकाच मुकादमाने दोन-तीन वाहनचालकांकडून घेतलेल्या पैशांमुळे यंदा ऊसतोड मजुरांची टंचाई जाणवत आहे. कोल्हापूर विभागात २० टक्के मजूर न आल्याने साखर कारखान्यांपुढे खुद्द तोडीशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत स्थानिकचे ५९ हजार, परजिल्ह्यांतील एक लाख ३२ हजार; तर परराज्यांतील ११ हजार असे दोन लाख चार हजार मजूर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आहेत.
वाहनचालक काेयत्यांच्या संख्येनुसार मुकादमाशी करार करतात. कोयत्याला ३० ते ४० हजार रुपये ॲडव्हास दिला जातो. मागील हंगामात सुमारे अडीच लाख मजूर विभागातील कारखान्यांकडे होते. मात्र मार्चपासून कोरोनाचे संकट आल्याने हंगाम संपूनही त्यांना गावाकडे जाता येईना. या कालावधीत त्रास झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यातच यंदा संपूर्ण राज्यात पाऊस चांगला झाल्याने मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यातील मजूर शेतीकामात गुंतले. करार झालेल्यांपैकी २० टक्के मजुरांनी पाठ फिरवल्याने ऊसतोडणीचा पेच आहे.
जिल्ह्यात ७० हजारांवर मजूर
सोलापूर : जिल्हात २६ साखर कारखान्यांचे गाळप सुरू असून ऊस तोडणीसाठी ७० हजाराहुन अधिक मजूर काम करीत आहेत. बुलढाणा, नांदेड, परभणी, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, धुळे जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर आले आहेत. प्रतिदिन ११हजार रे १२५० मेट्रीक टन गाळप क्षमता असलेले साखर कारखाने सुरू आहेत. यावर्षी ऊस तोडणीसाठी १५१ हार्वेस्टर मशिन आहेत. मशिनची संख्या असली तरी तोडणीसाठी मजुरांची आवश्यकता आहेच.
मजूर, मुकादमांकडून कोट्यवधींचा गंडा
सांगली/सातारा : गेल्या काही वर्षांत विदर्भ, मराठवाड्यातील ऊसतोड
मजूर व मुकादमांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ऊसतोडीसाठी लाखो रुपयांची
उचल घ्यायची आणि ऐन हंगामात परागंदा व्हायचे, असे प्रकार सुरू
आहेत. काही कारखान्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारीही दिल्या आहेत.
जिल्ह्यात १३ साखर कारखान्यांकडे दरवर्षी प्रत्येकी ४०० ते ५०० टोळ्यांचे करार होतात. सुमारे ५ ते ६ हजार टोळ्या येतात. वाहतूकदार संघटनेकडे १ हजार ६०० ऊस वाहनांची नोंद आहे. प्रत्येक मजूर ७० ते ८० हजारांची उचल घेतो. सातारा जिल्ह्यात प्रत्येक कारखान्याकडे किमान तीनशे ते साडेतीनशे टोळ्या असतात. यावर्षी मात्र दुष्काळी भागातही चांगला पाऊस झाल्याने सुमारे तीस टक्के कमी टोळ्या आल्या आहेत. ऊस तोडणी यंत्रांवर बऱ्याच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे.
सध्यातरी तोडणीची अडचण नाही
पुणे : जिल्ह्यात १८ साखर कारखाने आहेत. गाळप हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे. ऊसतोडणी कामगार मराठवाडा विशेषत: बीड जिल्ह्यातून येतो. तेथेही यंदा चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे थोडीफार शेती असलेला किंवा शेतावर काम करत असलेला मजूर तिकडे अडकला आहे. त्यातून कामगार कमी संख्येने जिल्ह्यात आलेले दिसतात, मात्र जिल्ह्यातील कारखानदारांकडून अद्याप त्याविषयी ओरड नाही. एकूण १८ साखर कारखाने आहेत.
एका कारखान्याची उचल ३० कोटी
हंगामात सरासरी सहा लाख टन गाळप करणारा कारखाना हंगामासाठी किमान ३०कोटी रुपयांची उचल मजुरांना देतो.
४००० टन रोजचे गाळप
१००० बैलगाडी
एक वाहनधारक वाहनापोटी सरासरी १० लाख उचल साखर कारखान्याच्या हमीवर बँका कर्जापोटी देतात. बैलगाडीमागे एक लाख रुपये उचल कारखाना देतो.