यंदा गोविंदांची घागर उताणीच
By Admin | Published: August 26, 2016 02:07 AM2016-08-26T02:07:57+5:302016-08-26T02:07:57+5:30
हंडी फोडण्यासाठी बघ्यांची गर्दी, काळजाचा ठोका चुकविणारा क्षण असे हे चित्र गेल्या वर्षीपर्यंत पहायला मिळत होते.
प्रत्येक ठिकाणी गोविंदांचा जल्लोष, बक्षीस जिंकण्यासाठी पथकांमधील चुरस, हंडी फोडण्यासाठी बघ्यांची गर्दी, काळजाचा ठोका चुकविणारा क्षण असे हे चित्र गेल्या वर्षीपर्यंत पहायला मिळत होते. मात्र या वर्षी दहीहंडी उत्सवाला नियमांची अट घातल्याने गोविंदांचा थरथराट पाहण्याची संधी मुकली. आयोजकांनीही शासनाच्या नियमाचे पालन करत यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्यातच धन्यता मानली. नवी मुंबई परिमंडळ एक परिसरात ४० दहीहंडी तर परिमंडळ दोन परिसरात १४० दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवातून जपली परंपरा
पामबीच मार्गावरील मोराज सर्कल येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक मंडळाची ‘सोनखारची हंडी’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार साधेपणाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा जल्लोष आणि दहा फुटांची हंडी फोडून आधुनिकतेमध्ये सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी उत्सवाचे संस्थापक दशरथ भगत, नगरसेविका वैजयंती भगत, अध्यक्ष निशांत भगत आदी उपस्थित होते.
शाळांमध्येही जल्लोष
शहरातील अनेक शाळांमध्ये आज रोजचे तास न घेता दहीहंडी उत्सव साजरा केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी लहान थर रचून हंडी फोडली आाणि गोविंदाच्या गाण्यावर ताल धरला. अनेक शाळांनी सामाजिकतेचे भान जपत उत्सवातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
सोसायट्यांचा पुढाकार
बालगोपाळांमध्ये असलेले दहीहंडीचे आकर्षण. हंडी फोडण्यासाठी चिमुकल्यांमध्ये असलेला उत्साह, उत्सवाचे पारंपरिक महत्त्व कळावे याकरिता शहरातील सोसायट्यांमध्ये यंदा साध्या पध्दतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेत दहीहंडी उत्सव साजरा केला.
पोलीस यंत्रणा सज्ज
उत्सवादरम्यान गैरप्रकार घडू नये याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज होती. आवश्यक ठिकाणी नाकाबंदी, वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उप आयुक्त प्रशांत खैरे यांनी दिली.