हज यात्रेसाठी यावर्षी राज्यातून 11 हजार जणांना संधी, यात्रेकरूंची संगणकाद्वारे सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 07:42 PM2018-01-11T19:42:32+5:302018-01-11T19:43:13+5:30
इस्लाम धर्मामध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या हज यात्रेसाठी यावर्षी राज्यातील ११ हजार ५२७ जणांना संधी मिळाली आहे.
मुंबई : इस्लाम धर्मामध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या हज यात्रेसाठी यावर्षी राज्यातील ११ हजार ५२७ जणांना संधी मिळाली आहे. गत वर्षापेक्षा ही संख्या २० टक्क्यांहून अधिक असून, हज यात्रेसाठीचे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी दिले.
महाराष्ट्र राज्य हज समितीच्यावतीने हज यात्रा-२०१८ साठी संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरूंची निवड करण्यात आली. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी हज कमिटी आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. खान, राज्य समितीचे इम्तियाज काझी उपस्थित होते. यावेळी सातत्याने तीन वर्षं अर्ज करूनही सोडतीमध्ये संधी न मिळालेल्यांना चौथ्या वर्षी हज यात्रेला जाण्याची संधी पूर्ववत सुरू करावी, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावर्षी हज यात्रेसाठी राज्यभरातून ४३ हजार ७७९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १,९३९ जणांना ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि १६ महिलांसाठी राखीव कोट्यातून संधी मिळाली आहे. उर्वरित ९ हजार जणांची निवड ४१ हजार ८२४ अर्जांतून ‘ड्रॉ’ काढून करण्यात आली आहे. इम्तियाज काझी यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले. अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, उपसचिव तडवी, वक्फ बोर्डचे चेअरमन एम. एम. शेख, शाखा अधिकारी फारूक पठाण आदी उपस्थित होते.