यावर्षी हापूस वधारणार!

By admin | Published: January 9, 2016 12:05 AM2016-01-09T00:05:25+5:302016-01-09T00:30:30+5:30

थंडीची लाट : गारव्यामुळे झाडांच्या उत्पादनक्षमतेत वाढ

This year the hapoos will rise! | यावर्षी हापूस वधारणार!

यावर्षी हापूस वधारणार!

Next

दापोली : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट उसळली असल्याने हापूस आंब्याला वातावरण पोषक आहे. यामुळे चालूवर्षी हापूसचे उत्पादन चांगले येईल, असा कयास बांधला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी हवेत चांगला गारवा टिकून आहे. वातावरणातील गारव्यामुळे झाडाची उत्पादनक्षमता वाढत असून, मोहोरधारणा होण्यासाठी वातावरण पोषक असल्याचे मत जिल्ह्यातील बागायतदार वर्तवित आहेत.
पाऊस कमी झाल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंंतेचे वातावरण होते. परंतु सुरुवातीलाच पडलेल्या थंडीमुळे बागायतदार सुखावला आहे. दापोली परिसरातील फजल रखांगे या आंबा व्यावसायिकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पाऊस सुरू झाल्यापासून निगा राखावी लागते. खत टाकणे, औषधे फवारणी करणे यांसारखी कामे विशिष्ट वेळेत पूर्ण करावी लागतात. हवेत गारवा नसेल, तर झाडांवर रोग पडणे, मोहोर वेळेत न येणे, आल्यास लवकर काळा पडून फळ धारणा न होणे, अशा समस्या उद्भवतात. परंतु अपेक्षित थंडी असल्याने रोगांची शक्यता कमी होते, फळधारणा चांगली होते. खर्चही मर्यादित राहतो. चालू वर्षीचा हंगाम बागायतदारांना पोषक असल्याचे त्यांनी सांगितले. लाडघर येथील राजाराम झगडे या आंबा व्यावसायिकांनी सांगितले की, समुद्राजवळ असणाऱ्या झाडांना चांगली फळधारणा होण्याचे संकेत मिळत असून, दाभोळ, बुरोंडी, पंचनदी परिसरातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हर्णै येथील सागर मयेकर यांच्याशी संपर्क साधला असता सध्या आपल्या काही झाडांना चांगली कैरी दिसू लागली असून, उत्पादन योग्यवेळी हाती लागण्याची चिन्ह असल्याचे त्यांनी सांगितले. विक्रांत मयेकर या आंबा बागायतदारांनी स्पष्ट केले की, डोंगरी चालू फळ यावर्षी बागायतदारांना दिलासा देणार असून, या हंगामात समाधानकारक उत्पादन मिळेल. आडे पाडले येथील आंबा बागायतदार अरूण लिमये यांनी सांगितले की, आंबा बागा थंडीमुळे चांगल्या बहरल्या असून, चालू वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पन्न हाती लागण्याची शक्यता आहे. झाडावर आलेला सर्व आंबा काढून होईल की नाही, याची चिंंता त्यांनी बोलून दाखवली. (प्रतिनिधी)


बागायतदारांना दिलासा : फळ पूर्ण होण्याची वाट पाहावी
गुहागरमधील सुबोध जाधव म्हणाले की, निसर्ग अजून तरी बागायतदारांना दिलासा देत आहे. काही बागायतदार आपल्या बागा कराराने व्यावसायिकांना देतात. वातावरण पोषक असल्याने बागांचा करारही गतवर्षीच्या तुलनेत चढ्या भावाने केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. देवगड येथील बागायतदार भाई खानविलकर म्हणाले की, किमान १५ ते २० दिवस वातावरणात असाच गारवा राहिला तर बागायतदारांना समाधानकारक उत्पादन हाती लागेल.


वि. र. हांडे यांची पेढी चालवणारे माणिक हांडे या आडतदारांनी सांगितले की, सध्या चित्र दिलासादायक असून, बागायतदारांनी फळ पूर्ण तयार होईपर्यंत वाट पाहावी, तोड लवकर झाली तर त्याचा दरावर विपरित परिणाम होऊ शकतो. आम्ही कसोशीने बागायतदारांसाठी विक्री करण्याचे काम करीत असून, चालू हंगाम चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. लहरी निसर्गाने अजून तरी बागायतदारांच्या बाजूने कल दिला असल्याने बागायतदार खुशीत असल्याचे चित्र आहे.


चांगली आवक
वाशी येथील आडतदार ल. पो. तांबे यांच्याशी संपर्क साधला असता चालू वर्षी चांगली आवक होण्याचे संकेत असून, योग्य वेळी फळ हाती लागले, तर बागायतदारांना चांगले पैसे मिळतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Web Title: This year the hapoos will rise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.